ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब पांडे यांच्या वाढदिवस सोहळ्यात जन्मा आलो त्याचे, आजी फळ झाले साचे यावर मार्गदर्शन

ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब पांडे यांच्या वाढदिवस सोहळ्यात जन्मा आलो त्याचे, आजी फळ झाले साचे यावर मार्गदर्शन

 

प्रतिनिधी ओमकार पोतलवाड

 

आयुष्य थोडे आहे, त्यामुळे प्रत्येक क्षणाचे महत्त्व ओळखून जाणीवपूर्वक आणि अर्थपूर्ण जीवन जगा. प्रत्येकाला आयुष्यात एक संधी मिळते; त्या संधीचा योग्य उपयोग करून आपल्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली पाहिजे, असे प्रेरणादायी प्रतिपादन ह.भ.प. डॉ. सुदाम महाराज पानेगावकर यांनी केले. ज्येष्ठ पत्रकार तथा व्हॉईस ऑफ मीडिया मराठवाडा विभागाचे उपाध्यक्ष बाळासाहेब पांडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते व्याख्यानातून बोलत होते.

 

वेळ ही माणसाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट असून जन्मापासून जीवनातील प्रत्येक टप्पा वेळेशी जोडलेला आहे. जन्माची वेळ मोजली जाते, बालपण, तारुण्य, विवाह आणि कर्तृत्वाचा काळही वेळेनुसार पुढे सरकत असतो. त्यामुळे मिळालेला प्रत्येक क्षण सार्थकी लावण्याची गरज असल्याचे डॉ. सुदाम महाराज पानेगावकर यांनी सांगितले.

 

यावेळी त्यांनी बाळासाहेब पांडे यांच्या सामाजिक, धार्मिक व पत्रकारितेतील कार्याचा गौरव केला. पत्रकाराला समाजाकडे चौकस नजरेने पाहण्याची आणि प्रश्नांच्या मुळाशी जाण्याची क्षमता असते. समाजातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे आणि जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पत्रकार करीत असतो, असे त्यांनी नमूद केले. बाळासाहेब पांडे यांची व्हॉईस ऑफ मीडिया मराठवाडा विभागाच्या उपाध्यक्षपदी झालेली निवड ही त्यांच्या पत्रकारितेतील कार्याची पावती असल्याचे सांगून डॉ. पानेगावकर यांनी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. व जीवनाच्या अर्थ सविस्तर पणे समजावून सांगितला

 

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान इंजि. दत्तू पा होटाळकर यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी पंचायत समिती सभापती प्रतिनिधी तथा नगरसेवक रवींद्र भालेराव व प्राचार्य मारोती माने, पाटीलसर, व्हि.सी. जाधवसर, मुख्याध्यापक साहित्यिक वेंकट आनेराय, उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वेंकट आनेराय सर, यांनी तर सूत्रसंचालन बालाजी पेटेकर सर यांनी केले.

 

माणिक नगर नायगाव येथील बाळासाहेब पांडे यांच्या वैष्णव कुंज या निवास स्थानी पार पडलेल्या वाढदिवसा निमित्त विचार दान या अनोख्या कार्यक्रमाच्या वेळी माणिक नगर, शिवम नगर, मॉर्निंग वॉक ग्रुप, व्हॉईस ऑफ मिडियाचे पत्रकार, शिक्षक, सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार, महिला व नागरिक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *