नरखेड पोलिसांची सराहनीय मोहीम; ३५ किलो प्रतिबंधित सुगंधी तंबाखू सह दुचाकी जप्त,

**नरखेड पोलिसांची सराहनीय मोहीम; ३५ किलो प्रतिबंधित सुगंधी तंबाखू सह दुचाकी जप्त, वर्ध्याच्या आरोपीला अटक**

**नरखेड:**

 

महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुगंधी तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला नरखेड पोलिसांनी सावरगाव ते काटोल रोडवर नाकाबंदी दरम्यान रंगेहात पकडले. आरोपीकडून सुगंधी तंबाखू आणि दुचाकीसह एकूण ६२,९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. नाकाबंदी दरम्यान संशयास्पदरीत्या येणारी होन्डा शाईन मोटर सायकल (क्रमांक एम.एच. ४० बी.वाय. १६७१) अडवून पंचांसमक्ष तपासणी केली असता, त्यात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू मिळून आला. याप्रकरणी पोलिसांनी वाहन चालक आरोपी मयुर शंकरलाल सचदेव (वय २७ वर्ष, रा. दयाल नगर, वर्धा) याला ताब्यात घेतले. घटनास्थळावरून २२,९८०/- रुपये किमतीचा ३५.४२५ किलो तंबाखू आणि ४०,०००/- रुपये किमतीची दुचाकी जप्त करण्यात आली.

सदर प्रतिबंधित तंबाखू मानवी जीवितास अपायकारक असून शासनाने यावर बंदी घातली आहे. आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन नरखेड येथे भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२३, २२३, २७४, २७५ सह अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियमान्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे.

 

 

विशेष प्रतिनिधी चंदू मडावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *