नागपूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई: ८ कोटींच्या बनावट नोटांसह दोन आरोपींना अटक

नागपूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई: ८ कोटींच्या बनावट नोटांसह दोन आरोपींना अटक

 

नागपूर: ‘चिल्ड्रेन्स बँक ऑफ इंडिया’ असे छापलेल्या तब्बल ८ कोटी ६५ लाख रुपये दर्शनी किमतीच्या बनावट नोटांच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या टोळीचा नागपूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून कारसह ३ लाख ४८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला .

 

२ जुलै २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून (क्र. MH 29 BC 4865) दोन इसम नागपूर-वर्धा महामार्गावरून बनावट नोटा घेऊन जात होते. या नोटांचा वापर करून ते नागरिकांची फसवणूक करण्याच्या तयारीत होते. पोलिसांनी आसोला ते सावंगी परिसरात सापळा रचून या कारचा पाठलाग केला आणि आरोपींना ताब्यात घेतले.

 

आरोपी

१. अफरोज खान जमीरउल्ला खान (वय ४३ वर्ष, रा. यवतमाळ)

२. इरशाद जुम्मन शेख (वय २६ वर्ष, रा. देवळी, जि. वर्धा)

तपासणी दरम्यान कारमध्ये ‘चिल्ड्रेन्स बँक ऑफ इंडिया’ असे छापलेले एकूण २,३०० नोटांचे बंडल सापडले. यात खालील नोटांचा समावेश होता:

 

५०० च्या नोटा: १,५०० बंडल (किंमत ७ कोटी ५० लाख)

२०० च्या नोटा: ३५० बंडल (किंमत ७० लाख)

१०० च्या नोटा: ४५० बंडल (किंमत ४५ लाख)

एकूण दर्शनी किंमत: ८ कोटी ६५ लाख रुपये.

याशिवाय, पोलिसांनी २,५०,००० रुपये किमतीची कार, २४,००० रुपयांचे मोबाईल फोन आणि ५,६०० रुपयांच्या खऱ्या नोटा असा एकूण ३,४८,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आरोपी बनावट नोटांच्या बंडलवर वरच्या बाजूला एक खरी नोट लावून ते बंडल खऱ्या नोटांचे असल्याचे भासवायचे आणि त्याद्वारे लोकांची फसवणूक करायचे, असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

ही कामगिरी नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अंकुश माने व त्यांच्या पथकाने केली आहे. याप्रकरणी बुटीबोरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

 

नागपुर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *