गोंडखैरी शिवारात पोलिसांची मोठी कारवाई; अवैध हातभट्टी दारू अड्ड्यांवर छापा टाकून ६ लाख ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त
कळमेश्वर:
कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा गोंडखैरी पारधी बेडा शिवारात अवैधरीत्या सुरू असलेल्या मोहाफुल गावठी हातभट्टी दारू निर्मितीच्या अड्ड्यांवर कळमेश्वर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी मोहाफुल रसायन सडवा आणि तयार गावठी दारूसह एकूण ६ लाख ४४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, एकूण आठ आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहेत.
गोंडखैरी पारधी बेडा शिवारात मोहाफुलाचा सडवा वापरून हातभट्टीची दारू तयार केली जात असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे दिनांक २३ सप्टेंबर २०२६ रोजी पोलिसांनी घटनास्थळी अचानक छापा टाकून तेथे सुरू असलेल्या हातभट्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त केल्या. या वेळी पंचांसमक्ष करण्यात आलेल्या कारवाईत १५ हजार ४०० लिटर मोहाफुल सडवा, २३० लिटर तयार गावठी दारू, लोखंडी व प्लास्टिकचे ड्रम, जळाऊ लाकूड, पाईप आणि दारू गाळण्याचे इतर साहित्य जप्त करण्यात आले. यातील नाशवंत मुद्देमाल घटनास्थळावरच नियमानुसार पंचनामा करून नष्ट करण्यात आला.
सदर धडक कारवाई नागपूर ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के आणि सावनेर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कळमेश्वर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक मनोज काळबांधे यांच्या नेतृत्वात कळमेश्वर पोलीस दल, दंगा नियंत्रण पथक आणि होमगार्डच्या जवानांनी ही कामगिरी यशस्वीरीत्या पूर्ण केली. या प्रकरणी एकूण आठ आरोपींविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये स्वतंत्र आठ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील कायदेशीर तपास करीत आहेत.
विशेष प्रतिनिधी चंदू मडावी
