नरखेड परिसरात चंदन तस्कर टोळीचा पर्दाफाश; अपराध शाखेकडून 2 आरोपींना अटक

नरखेड परिसरात चंदन तस्कर टोळीचा पर्दाफाश; अपराध शाखेकडून 2 आरोपींना अटक, 4,96,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त

 

33.60 किलो चंदनाचे लाकूड, दुचाकी आणि तोडकामाची हत्यारे जप्त; अपराध शाखेची कारवाई

 

नरखेड:

नागपूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने नरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा सिंधी उमरी गावातील शेतातून मौल्यवान चंदनाची झाडे तोडून तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी 2 संशयित आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून 33.60 किलोग्रॅम चंदनाच्या लाकडासह गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि झाडे कापण्याची हत्यारे असा एकूण 4,96,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मौजा सिंधी उमरी येथील एका शेतातून अज्ञात चोरांनी चंदनाची झाडे कापून चोरी केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी नरखेड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 303(2) अन्वये अपराध क्रमांक 609/26 नोंदवून तपास सुरू करण्यात आला होता. ग्रामीण भागातील मौल्यवान झाडांच्या चोरीच्या घटना गांभीर्याने घेत नागपूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या प्रकरणाचा समांतर तपास करत होते.

तपासादरम्यान दिनांक 27/09/2026 रोजी गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली. उपलब्ध तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून अनिस नरेश राजपूत, वय 34 वर्षे, रा. घुबडमेट, ता. काटोल, जि. नागपूर तसेच रजनीकांत धुर्बेसिंग मारवाडी, वय 32 वर्षे, रा. गोंडखैरी, ता. कळमेश्वर, जि. नागपूर यांना संशयावरून ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत दोघांनीही सिंधी उमरी येथील शेतातून चंदनाची झाडे कापून चोरी केल्याची कबुली दिली; त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही रीतसर अटक केली.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींच्या ताब्यातून चोरी केलेल्या 4 झाडांमधून काढलेले 3,96,000 रुपये किमतीचे 33.60 किलोग्रॅम चंदनाचे लाकूड जप्त केले आहे. याव्यतिरिक्त गुन्ह्यात वापरलेली 1,00,000 रुपये किमतीची टीव्हीएस ॲक्टिव्हा 125 दुचाकी, क्रमांक एमएच-40/डीबी-9490 आणि झाडे तोडण्यासाठी वापरलेली 100 रुपये किमतीची 1 लोखंडी आरी व 100 रुपये किमतीची 1 लोखंडी कुऱ्हाड, असा एकूण 4,96,200 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

ही संपूर्ण कारवाई नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार आणि अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही धडक कारवाई करून या गुन्ह्याचा यशस्वी पर्दाफाश केला आहे.

 

 

 

विशेष प्रतिनिधी चंदू मडावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *