कोंढाळी पोलिसांची धडक कारवाई: आडेगाव येथे विदेशी दारूची अवैध वाहतूक पकडली; तिघांवर गुन्हा, ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त
कोंढाळी:
दुचाकीवरून विनापरवाना अवैध रीतीने विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या तिघांविरुद्ध कोंढाळी पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी विदेशी दारूच्या बाटल्या आणि दुचाकीसह एकूण ६४ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कोंढाळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २९ सप्टेंबर २०२६ रोजी एका दुचाकीवरून अवैध विदेशी दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आडेगाव येथे तत्काळ नाकाबंदी केली. नाकाबंदीदरम्यान संशयित मोटारसायकल (क्रमांक एम एच-४०/सी वाय-०४९८) थांबवून पंचांसमक्ष तपासणी केली असता, वाहनातून विदेशी दारूचा साठा मिळून आला.
या प्रकरणात १. कैलास निमदेव वाघधरे (वय ४२ वर्षे, रा. आडेगाव), २. विक्की ज्ञानेश्वर ढवळे (वय २८ वर्षे, रा. आडेगाव) आणि ३. विजय जयस्वाल (रा. बाजारगाव) हे अवैध दारूची वाहतूक करताना आढळून आले.
पोलिसांनी पंचांसमक्ष वेगवेगळ्या कंपन्यांच्या विदेशी दारूच्या ७२ बाटल्या/निपा (किंमत १४,६४० रुपये) तसेच ५० हजार रुपये किमतीची मोटारसायकल, असा एकूण ६४ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी तिन्ही संशयित आरोपींविरुद्ध कोंढाळी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.
विशेष प्रतिनिधी चंदू मडावी
