पारशिवनी येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, २८ लाख ९३ हजारांच्या मुद्देमालासह पाच जण ताब्यात
पारशिवनी: मौजा कालभैरव देवस्थान परिसरातील उघड्या जागेवर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पारशिवनी पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी पाच जणांना रंगेहात पकडले असून त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल फोन आणि वाहनांसह एकूण २८ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पारशिवनी पोलिसांना ३० सप्टेंबर रोजी गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली होती की, कालभैरव देवस्थान परिसरातील सार्वजनिक खुल्या जागेत काही इसम ५२ ताशपत्त्यांवर पैशांची पैज लावून जुगार खेळत आहेत. माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी पोहोचून छापा टाकला असता काही इसम प्रत्यक्ष जुगार खेळताना मिळून आले. पोलिसांनी तातडीने घेराबंदी करून पाचही संशयितांना ताब्यात घेतले.
कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये धम्मदीप नगर विटभट्टी चौक येथील शंकर कैलास सूर्यवंशी वय ४९ वर्षे, आनंद नगर बिनाकी मंगळवारी कांजी हाऊस येथील पंकज सुरेश हारोडे वय ४० वर्षे, कामठी रोड यादवनगर येथील प्रकाश गणपत कूकडे वय ४० वर्षे, बिनाकी मंगळवारी कांजी हाऊस येथील हितेश नारायण चंद्रवंशी वय ४२ वर्षे आणि आनंद नगर बिनाकी मंगळवारी कांजी हाऊस येथील क्षितिज अशोक बंजारी वय ४७ वर्षे यांचा समावेश आहे. हे सर्व आरोपी नागपूर येथील रहिवासी आहेत.
घटनास्थळावरून पोलिसांनी ५२ ताशपत्ते, ५० हजार रुपये रोख रक्कम, ६३ हजार रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे ५ मोबाईल फोन तसेच २७ लाख ८० हजार रुपये किमतीची ४ दुचाकी आणि ३ चारचाकी अशी एकूण ७ वाहने जप्त केली आहेत. जप्त करण्यात आलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत २८ लाख ९३ हजार रुपये आहे. या प्रकरणी पारशिवनी पोलीस ठाण्यात सर्व पाचही जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम १२ अन्वये गुन्हा नोंदवून पुढील कायदेशीर तपास सुरू करण्यात आला आहे.
विशेष प्रतिनिधी चंदू मडावी
