नागरा परिसरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सहा जण ताब्यात
रोख रक्कम, चारचाकी वाहनासह ४ लाख ७० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
गोंदिया : पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या निर्देशानुसार गोंदिया ग्रामीण पोलिसांनी नागरा परिसरातील शेतशिवारात सुरू असलेल्या कथित अवैध जुगारावर धाड टाकून सहा जणांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत रोख रक्कम, चारचाकी वाहन व जुगाराचे साहित्य असा एकूण ४ लाख ७० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांना २ ऑक्टोबर रोजी पेट्रोलिंगदरम्यान गोपनीय माहिती मिळाली की, नागरा परिसरातील शेतशिवारात काही इसम ५२ तासपत्तीवर पैशांची बाजी लावून हार-जीतचा जुगार खेळत आहेत. माहितीची खात्री करून गोंदिया ग्रामीण पोलिसांच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला.
यावेळी निलेश पन्नालाल मचाळे (३५, नागरा), प्रणय राजेश नागरीकर (२३, नागरा), इरफान मुबारक शेख (३४, अंभोरा), आकाश शम्भूदयाल अग्रवाल (४५, सावरी), अनिल हेमराज बिसेन (३०, अंभोरा) आणि सुभाष राजाराम बान्ते (४८, नागरा) हे सहा जण जुगार खेळताना आढळून आले.
पंचांसमक्ष झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून ६० हजार ५०० रुपये रोख, सुमारे ४ लाख १० हजार रुपये किमतीचे चारचाकी वाहन तसेच जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण ४,७०,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांची चाहूल लागताच काही जुगारी घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात सहा आरोपींविरुद्ध महाराष्ट्र (मुंबई) जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या निर्देशानुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशचंद्र शुक्ला तसेच प्रभारी अधिकारी दिपम दहिवले यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया ग्रामीण पोलिसांच्या पथकाने केली. सपोनि विरेन्द्र भोसले, पोउनि अंकित सोनवाने यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.
गोंदिया जिल्हा प्रतिनिधी महादेव शेन्डे
