न्यू मॉडेल डिग्री कॉलेज हिंगोली स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड उपकेंद्र ‘खेलो इंडिया संवाद : खेल की बात, पीएम के साथ – युवा कनेक्ट’ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण
हिंगोली प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे
हिंगोली,दि. २७ ऑगस्ट:- महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने युवकांचा क्रीडा क्षेत्रातील सहभाग वाढविणे, क्रीडा विकासाला चालना देणे आणि राष्ट्रनिर्माणात युवकांची भूमिका बळकट करणे, या उद्देशाने देशभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी दिनांक २७ ऑगस्ट २०२६ रोजी आभासी माध्यमातून देशभरातील विविध ठिकाणांहून सहभागी झालेल्या लाखो युवकांशी तसेच परभणी जिल्ह्यातील युवकांशी संवाद साधला.
यानिमित्ताने हिंगोली न्यू मॉडेल डिग्री कॉलेज हिंगोली स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड उपकेंद्र राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि मेरा युवा भारत (MY Bharat), हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘खेलो इंडिया संवाद : खेल की बात, पीएम के साथ – युवा कनेक्ट’ या विशेष कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले.
‘युवा कनेक्ट’ या उपक्रमाच्या माध्यमातून युवक, खेळाडू, युवा नेते, स्वयंसेवक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांना एका व्यासपीठावर आणून भारतातील क्रीडा क्षेत्राचा विकास, युवकांच्या आकांक्षा आणि भविष्यातील संधी याबाबत संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली.
या कार्यक्रमास माजी आमदार गजाननराव घुगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय प्रा.डॉ.नामदेव सोळंके इन्द्र मणि माध्यमातून अध्यक्षस्थानी उपस्थित होते. यावेळी शिवाजीराव मुटकुळे, मेरा युवा भारत चे प्रविण पांडे, राष्ट्रीय सेवा योजना चे डॉ.पवन वासनिक, Youth आयकॉन राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते पुष्यमित्र जोशी तसेच कबडी विजेते खेळाडू श्री. शेख नोमान यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी देशाचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांनी युवकांना क्रीडा, युवाशक्ती आणि राष्ट्रनिर्माणातील युवकांच्या भूमिकेबाबत केलेल्या मार्गदर्शनाचा लाभ उपस्थितांनी घेतला. कार्यक्रमात माननीय केंद्रीय क्रीडामंत्री, माननीय क्रीडा राज्य मंत्री, विविध राज्यांचे माननीय मुख्यमंत्री तसेच देशभरातील, विद्यापीठाचे प्रमुख अधिकारी, प्राचार्य, शास्त्रज्ञ प्राध्यापक, आणि महाविद्यालयांतील विद्यार्थी आभासी माध्यमातून सहभागी झाले.
माननीय केंद्रीय क्रीडामंत्री श्री. मनसुख मांडविया यांनी युवकांना योग्य दिशा देणे आवश्यक असल्याचे सांगितले. युवक हे राष्ट्रनिर्माणात योगदान देणारे महत्त्वपूर्ण घटक असून, त्यांच्या माध्यमातूनच विकसित भारताचे स्वप्न पूर्णत्वास येईल, असे त्यांनी नमूद केले. युवकांना घडविण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली कौशल्य विकास, उद्योजकता विकास आणि रोजगाराच्या विविध संधींची दालने खुली करण्यात आली आहेत. तसेच ‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून युवकांना २०३६ मध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धांसाठी भारतीय खेळाडू तयार करण्याबरोबरच त्यांचा शारीरिक विकास साधण्यासाठी प्रोत्साहन दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार गजाननराव घुगे यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांचा युवकांसाठीचा संदेश महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. ‘सशक्त भारत, नशामुक्त भारत’ निर्माण करणे ही काळाची गरज आहे. कोणत्याही आई-वडिलांची अपेक्षा आपल्या पाल्याने सुसंस्कृत होऊन मोठे अधिकारी व्हावे, अशी असते; मात्र अनेक युवक व्यसनांच्या आहारी जाताना दिसतात. त्यांना या विळख्यातून बाहेर काढणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे त्यांनी नमूद केले. मोबाईलचे अतिवापराचे व्यसनदेखील सध्याच्या काळातील गंभीर समस्या असून, युवकांनी त्यापासून दूर राहावे आणि इतरांमध्येही याबाबत जागरूकता निर्माण करावी, असे आवाहन त्यांनी केले.
शरीरसंपदा जपण्यासाठी मैदानी खेळ आवश्यक असून, विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच खेळाची आवड जोपासावी, असे त्यांनी सांगितले. हिंगोली जिल्ह्यातील खेळाडू राष्ट्रीय पातळीवर सातत्याने चमकत आहेत. खेळाच्या माध्यमातून सर्वजण एकत्र येतात; जात-धर्माचा भेद राहत नाही आणि एकोपा वाढतो. त्यामुळे सर्वांनी खेळाला महत्त्व द्यावे, तसेच युवकांनी परस्परांशी अधिकाधिक संवाद साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्राचार्य प्रा.(डॉ.) नामदेव सोळंके यांनी आजचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण असून, युवकांना योग्य दिशा व मार्गदर्शन देणे आवश्यक असल्याचे सांगितले. युवक हे राष्ट्रनिर्मितीतील महत्त्वाचे घटक असून, देशाचे यश आणि अपयश हे युवकांच्या शक्तीच्या योग्य वापरावर अवलंबून आहे. युवकांकडे मोठी ऊर्जा आणि क्षमता आहे; तिचा योग्य दिशेने उपयोग केला पाहिजे. आजचे युवक भविष्यात देशाची धुरा सांभाळणारे व्यक्तिमत्त्व असतील आणि त्यांच्या हातून देश घडणार आहे, असे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वात ‘युवा कनेक्ट’ च्या माध्यमातून युवकांशी सातत्याने संवाद व समन्वय ठेवणे आवश्यक आहे. यातूनच देश आणि समाजाचे हित साध्य होईल. विद्यापीठातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांमधील नाते अधिक दृढ होण्याच्या दृष्टीनेही त्यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थी हे केवळ स्वतःच्या भविष्यासाठीच नव्हे, तर राष्ट्रनिर्मितीसाठीही महत्त्वपूर्ण घटक आहेत. त्यामुळे विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी सदैव संपर्कात राहण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना निःसंकोचपणे संपर्क साधता येईल, असे वातावरण महाविद्यालय मध्ये निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी केले. ‘युवा कनेक्ट’ उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये दृढ नाते असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी ‘खेलो इंडिया’ उपक्रमाची माहिती देताना क्रीडा संस्कृती जपण्यासाठी अभ्यासासोबतच खेळाचे महत्त्व विद्यार्थ्यांनी समजून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. २०३६ च्या ऑलिंपिक स्पर्धांच्या अनुषंगाने भारताला क्रीडा क्षेत्रात सक्षम करण्याच्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला चालना देण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे त्यांनी आवाहन केले. भारतातील पारंपरिक व महत्त्वाच्या खेळांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रोत्साहन देण्याची गरज असून, शरीर, मन आणि आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी खेळांना अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सदर कार्यक्रम मेरा युवा भारत चे जिल्हा युवा अधिकारी प्रणित सांगवीकर व अनिल जी ढेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा टोपे यांनी केले, तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे पवन वासनिक यांनी मानले.
यावेळी उपस्थितांनी नशामुक्तीची शपथ घेतली. तसेच कबड्डी खेळाडू शेख नोमान यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी पवन वासनिक, प्रा.बी.बी चव्हाण, प्रा.गौरव गोरे प्रा.सिद्धार्थ खंदारे, प्रा.स्नेहा शिर्के, प्रा.सुनील पाटील, प्रा.आतिश कदम व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमास महाविद्यालयांतील अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
