वसमर येथे आज रोजी श्री योगानंद स्वामी महाविद्यालयात नवमतदार नोंदणी शिबिर उत्साहात संपन्न राष्ट्रीय सेवा योजना विभाग व महाराष्ट्र शासन निवडणूक विभागाचा संयुक्त उपक्रम; ५० नवमतदारांची नोंदणी वसमत, दि. ९ ऑक्टोबर : येथील श्री योगानंद स्वामी महाविद्यालय, वसमत येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि महाराष्ट्र शासन निवडणूक विभाग, वसमत यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी विशेष मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये जवळपास ५० नवमतदारांनी आपली नावनोंदणी केली.
लोकशाही व्यवस्थेत मतदानाचे महत्त्व, मतदार म्हणून असलेले अधिकार आणि कर्तव्ये यांविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे, तसेच पात्र विद्यार्थ्यांना मतदार यादीत नाव नोंदविण्यास प्रोत्साहित करणे हा या शिबिराचा प्रमुख उद्देश होता. विद्यार्थ्यांनी लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा आणि मतदानाविषयी जागरूक राहावे, यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नागनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर संपन्न झाले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. संदीप गोरे, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. बाळासाहेब भिंगोले, डॉ. सौ. वर्षा डोडिया आणि डॉ. मीनाक्षी बोरिवले यांनी शिबिराच्या यशस्वितेसाठी विशेष प्रयत्न केले.
या शिबिरामध्ये महाविद्यालयातील पात्र विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी नवमतदारांना मार्गदर्शन करण्यासह नोंदणी प्रक्रियेसाठी आवश्यक सहकार्य केले. त्यांच्या परिश्रमामुळे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.
विद्यार्थ्यांमध्ये मतदानाविषयी जागरूकता निर्माण करून त्यांना लोकशाही प्रक्रियेशी जोडण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला. “मतदार नोंदणी करा, लोकशाही मजबूत करा” या संदेशातून विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक म्हणून लोकशाहीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
छाया नागेश चव्हाण
प्रतिनिधी सचिन घारपुरे
