सगरोळीच्या विद्यार्थ्यासाठी उद्योगविश्वाची दारे खुली होणार!

सगरोळीच्या विद्यार्थ्यासाठी उद्योगविश्वाची दारे खुली होणार!

 

सगरोळी दि.१५

 

सगरोळी : ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या कौशल्यविकासाला चालना देत त्यांना उद्योगविश्वाशी जोडण्याच्या दिशेने सगरोळी येथील संस्कृति संवर्धन मंडळ संस्थेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.एन.जी.ओ.ॲंड काॅरपोरेट पार्टनर मीट (NGO & Corporate Partner Meet) च्या निमित्ताने संस्थेच्या शिक्षण समन्वयिका सौ. श्रद्धा देशमुख आणि श्रेया देशमुख यांनी ९ ऑक्टोबर रोजी पुणे येथील सिम्बायोसिस स्टीव्ह ॲन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (Symbiosis Skills and Professional University) ला भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यार्थिनींचे कौशल्यविकास, उद्योगक्षेत्रातील रोजगाराच्या संधी आणि संस्थात्मक सहकार्याच्या विविध शक्यतांवर सकारात्मक चर्चा झाली.

या भेटीत ॲटोमेशन ॲन्ड मॅनीफॅक्चरींग एक्सलेशन्स( Automation and Manufacturing Excellence) या क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या संस्थेतील विद्यार्थिनींशी संवाद साधण्यात आला. त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची, प्रत्यक्ष शिक्षणातील अनुभवांची आणि भविष्यातील करिअर विषयक आकांक्षांची माहिती घेण्यात आली. तसेच विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना कौशल्याधारित शिक्षण, उद्योगांच्या बदलत्या गरजा, रोजगाराच्या संधी आणि विद्यार्थ्यांना व्यावसायिक क्षेत्रासाठी सक्षम बनविण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला.

*सगरोळी भेटीचे आश्वासन;*

सहकार्याच्या नव्या वाटा खुल्या होण्याची अपेक्षा

या भेटीचे महत्त्वपूर्ण फलित म्हणजे सिम्बायोसिस स्टीव्ह ॲन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (Symbiosis Skills and Professional University )च्या प्रमुख स्वाती मुजुमदार यांनी सगरोळी येथे भेट देण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या प्रस्तावित भेटीमुळे सगरोळीतील विद्यार्थ्यांसाठी कौशल्यविकास, उद्योगविश्वातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, रोजगाराभिमुख शिक्षण आणि विविध संस्थांशी सहकार्याच्या नव्या संधी उपलब्ध होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आणि क्षमता असूनही त्यांना उद्योगविश्वाशी थेट संपर्क साधण्याच्या संधी अनेकदा मर्यादित असतात. ही दरी कमी करण्यासाठी शैक्षणिक संस्था आणि औद्योगिक क्षेत्र यांच्यातील समन्वय महत्त्वाचा ठरतो. या पार्श्वभूमीवर सगरोळी येथील संस्कृति संवर्धन मंडळ या संस्थेने केलेला हा पुढाकार विद्यार्थिनींना केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कौशल्ये, व्यावसायिक अनुभव आणि करिअरच्या संधी मिळवून देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.

ग्रामीण विद्यार्थिनींच्या स्वप्नांना कौशल्याची जोड, शिक्षणाला उद्योगविश्वाची साथ आणि उज्ज्वल भविष्याला नव्या संधींचे बळ देण्याच्या दिशेने ही भेट आशादायी ठरली आहे. भविष्यात या सहकार्यातून सगरोळी व परीसरातील विद्यार्थिनींसाठी प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सी टी इंडीया साठी ॲड.प्रकाश जोशी, सगरोळी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *