लाखांदूर पोलिसांची धडक कारवाई: सराफा दुकानातील चोरीचा पर्दाफाश; मोटारसायकलसह ७०० ग्रॅम चांदी जप्त, तिघे ताब्यात
लाखांदूर:
लाखांदूर पोलिसांनी डी.बी. पथकाच्या गस्तीदरम्यान एका मोठ्या घरफोडीचा आणि दुकानावरील चोरीचा यशस्वी पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी दोन अल्पवयीन बालकांसह तिघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून चोरीची मोटारसायकल आणि सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
डी.बी. पथकाचे पो.हवा. चव्हाण आणि त्यांचे सहकारी मौजा झिरोबा परिसरात गस्तीवर असताना, त्यांना एका अल्पवयीन मुलाकडे संशयास्पद मोटारसायकल आढळली. त्याची कसून चौकशी केली असता, ही मोटारसायकल २८ ऑगस्ट २०२६ रोजी गोंदिया येथून चोरी केल्याची कबुली त्याने दिली.
सराफा दुकानातील चोरीचा खुलासा: आरोपींची अधिक चौकशी केली असता, त्यांनी ५ व ६ ऑक्टोबर २०२६ च्या रात्री मौजा पिंपळगाव/निपानी (ता. पवनी) येथील एका सोन्याच्या दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केल्याचे सांगितले. तेथून त्यांनी सोने, अंदाजे ७०० ग्रॅम चांदी आणि बेनटेक्सच्या वस्तू चोरल्या होत्या.
दागिन्यांची विल्हेवाट: चोरलेले दागिने त्यांनी ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दिघोरी (नागपूर) येथील मुन्ना नावाच्या मित्राला २५,००० रुपयांत विकल्याचेही समोर आले आहे.
१. मोटारसायकल चोरीप्रकरणी रावनवाडी पोलीस स्टेशन (गोंदिया) येथे अप. क्रमांक 425/2026 कलम 303 (2) भा.न्या.सं. नुसार गुन्हा नोंद आहे.
२. सोन्या-चांदीच्या चोरीप्रकरणी अड्याळ पोलीस स्टेशन (जि. भंडारा) येथे अप. क्रमांक 451/2026 कलम 305 (अ), 331 (4) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन सा., अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे सा., पो.नि. भालेराव सा., आणि सपोनि. गद्रे सा. यांच्या मार्गदर्शनात पो.हवा. चव्हाण व पो.आ. सपाटे (पो.स्टे. लाखांदूर) यांनी केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार
