
गौताळा औट्रम घाट अभयारण्यात चंदन तस्करीचा कहर – अधिकाऱ्यांच्या संगनमताचा गंभीर आरोप
- CT India News
- Sep 3
- 1 min read
गौताळा औट्रम घाट अभयारण्यात चंदन तस्करीचा कहर – अधिकाऱ्यांच्या संगनमताचा गंभीर आरोप
जळगाव / नागपूर :
गौताळा औट्रम घाट अभयारण्य (पाटणादेवी विभाग, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) येथे चंदन तस्करीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, संबंधित क्षेत्रीय वन अधिकारी व कर्मचारी यांच्या संगनमतानेच ही तस्करी होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.
गोपनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटणादेवी परिसरात दहा-पंधरा जणांचे तस्कर टोळके सलग ३-४ दिवस मुक्काम करून, अत्याधुनिक कटरच्या सहाय्याने जिवंत चंदन वृक्षांची कत्तल करून तस्करी करीत आहेत. लोणजे, सांगवी ते राजदेहरे या संपूर्ण पट्ट्यातील चंदन वृक्षांची मोठ्या प्रमाणावर नासधूस झाली आहे.
या तस्करीमुळे –
अभयारण्यातल्या मौल्यवान वनस्पती व वन्यजीवांचे प्रचंड नुकसान होत आहे.
बिबट्या, वाघ, रानडुक्कर यांसारखे प्राणी जंगल सोडून लोकवस्तीत शिरत असल्याने मानव-वन्यजीव संघर्ष वाढीस लागला आहे.
स्थानिक आदिवासी व ग्रामस्थांच्या पारंपरिक हक्कांवरही गदा आली आहे.
या संदर्भात दाखल केलेल्या तक्रारीत मागणी करण्यात आली आहे की –
पाटणादेवी परिसरात तात्काळ विशेष तपासणी करून इतर विभागातील सक्षम प्रामाणिक अधिकारी नेमले जावेत.
चंदन तस्करांसोबतच त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवरही वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972, भारतीय वन अधिनियम 1927, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986, महाराष्ट्र वृक्षतोड नियमन अधिनियम 1964 तसेच भारतीय दंड संहिता कलम 379, 120B, 409 नुसार कठोर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर निलंबन व विभागीय चौकशी तातडीने राबवावी.
या प्रकरणाची चौकशी सेंट्रल एम्पॉवर्ड कमिटी (CEC) व राष्ट्रीय हरित लवाद (NGT) यांच्या देखरेखीखाली करण्यात यावी.







Comments