मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत गौरव

*मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत गौरव*

 

 

हिंगोली प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे

हिंगोली दि. २८ : महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘१५० दिवस सेवाकर्मी कार्यक्रम’ अंतर्गत उत्कृष्ट प्रशासकीय कामगिरी केल्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई येथे राज्यस्तरीय सन्मान करण्यात आला. हा सन्मान राज्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या निवडक जिल्हा परिषदांना प्रदान करण्यात येत असून, हिंगोली जिल्ह्याने यामध्ये उल्लेखनीय स्थान मिळवले आहे.

या १५० दिवसांच्या विशेष मोहिमेत जिल्हा परिषद हिंगोलीने प्रशासनातील पारदर्शकता, गतिमानता व कार्यक्षमतेस प्राधान्य देत विविध सुधारणा राबवल्या. विशेषतः प्रलंबित प्रशासकीय कामे वेळेत पूर्ण करून शासकीय यंत्रणेला अधिक परिणामकारक बनविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

यामध्ये सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या ज्येष्ठता याद्या अद्ययावत करून त्या प्रसिद्ध करण्यात आल्या. पदोन्नती प्रक्रिया वेगाने पूर्ण करून पात्र कर्मचाऱ्यांना न्याय देण्यात आला. तसेच, सरळसेवेतील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया गतिमान करून प्रशासनातील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यात आली. बिंदुनामावली अद्ययावत करून तिचे प्रमाणिकरण करण्यात आले, ज्यामुळे आरक्षण व सेवा विषयक बाबींमध्ये पारदर्शकता सुनिश्चित झाली.

अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीची प्रक्रिया देखील यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली, ज्यामुळे संबंधित कुटुंबांना तातडीने आधार मिळाला. या सर्व कामांमुळे प्रशासनातील विश्वासार्हता व उत्तरदायित्व वाढले आहे.

तसेच, केंद्र शासनाच्या IGOT कर्मयोगी पोर्टलवर सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची नोंदणी करून त्यांना कौशल्यवृद्धीसाठी विविध प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करण्यास प्रवृत्त करण्यात आले. प्रत्येक कर्मचाऱ्याने किमान पाच अभ्यासक्रम पूर्ण केले असून, यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेत व सेवाभिमुखतेत सकारात्मक बदल झाला आहे.

यासोबतच, सर्व कर्मचाऱ्यांच्या मूळ व दुय्यम सेवा पुस्तिका अद्ययावत करून त्यांचे संगणकीकरण करण्यावर भर देण्यात आला. यामुळे सेवा नोंदी अधिक अचूक व सुलभ झाल्या असून भविष्यातील प्रशासकीय निर्णयप्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.

जिल्हा परिषद हिंगोलीने प्रभावी नियोजन, विभागांतील सुसूत्रता, समन्वय, वेळेचे काटेकोर पालन व उद्दिष्टपूर्ती यामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावल्यामुळेच हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे. हा गौरव केवळ एका अधिकाऱ्याचा नसून संपूर्ण जिल्हा परिषद यंत्रणेच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी नमूद केले.

या यशामागे जिल्हा परिषदेमधील सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी, तसेच विविध स्तरांवरील समन्वय आणि टीमवर्क महत्त्वपूर्ण ठरले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भविष्यातही हीच कार्यपद्धती कायम ठेवून नागरिकांना अधिक दर्जेदार, पारदर्शक, गतिमान आणि परिणामकारक सेवा देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

या राज्यस्तरीय गौरवामुळे जिल्हा परिषद हिंगोलीच्या कामकाजाला नवी दिशा मिळणार असून, प्रशासनातील उत्कृष्टतेचा हा आदर्श इतर जिल्ह्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *