वडोदा पोलिसांची मोठी कारवाई; पण भंडारा जिल्ह्यातून नागपूरकडे होणाऱ्या अवैध गोवंश तस्करीत ‘खाकी’चीच मेहेरबानी?
भंडारा/नागपूर:भंडारा जिल्हा आणि वडोदा (नागपूर) परिसरातून नागपूरच्या दिशेने होणारी अवैध गोवंश वाहतूक आता चव्हाट्यावर आली आहे. वडोदा पोलिसांनी नुकतीच धडक कारवाई करत ९ गोवंशांची सुटका केली आणि सुमारे ७.लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मात्र, या कारवाईने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले असून, भंडारा जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेच्या संशयास्पद भूमिकेकडे बोट दाखवले आहे.तस्करीचा ‘हा’ हायवे नेमका कोणाच्या आशिर्वादाने?मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, भंडारा जिल्ह्यातील पोलीस स्टेशन मोहाडी आणि वरठी या भागातून दररोज बिनधास्तपणे अवैध गोवंश वाहतूक केली जाते. तस्करांचे धाडस इतके वाढले आहे की, हा गोवंश मोहाडी-वरठी हद्दीतून निघून व्हाया शहापूर ते मौदा नागपूर मार्गे थेट नागपूर शहराकडे रवाना केला जातो.अनेक तपास नाके (चेक पोस्ट) ओलांडून ही वाहने विना अडथळा पुढे जातातच कशी? सूत्रांच्या मते, जिल्हा वाहतूक शाखा भंडारा येथील एका पोलीस उपनिरीक्षकासह (PSI) मोहाडी आणि वरठी पोलीस स्टेशनच्या काही जबाबदार अधिकाऱ्यांचे या तस्करांना थेट ‘अभय’ आणि आशिर्वाद असल्याचे दिसून येत आहे. वरकमाईच्या नादात कायदा आणि प्राण्यांच्या संरक्षणाची उघडपणे पायमल्ली होत आहे.
थरारक पाठलाग!वडोदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली. पोलिसांनी कढोली शिवार येथील जयस्वाल ढाब्यासमोर नाकाबंदी केली. गोवंश तस्करांनी पोलिसांना पाहताच ‘बोलेरो पिकअप'(एम एच-४०/डी. सी-३७५०) थांबवून अंधाराचा फायदा घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला.पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून आदेश यशवंत झांझाड (वय १९, रा. पार्डी, ता. मोहाडी) या क्लीनरला दि.२ ऑगस्ट २०२६ रविवारी रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास ताब्यात घेतले. मुख्य चालक अर्जुन झांझाड आणि वाहन मालक अर्पित उर्फ श्रेयस किरण डाकरे (रा. पांजरा-वरठी, ता. मोहाडी, जि. भंडारा) हे पळून जाण्यात यशस्वी झाले. प्राण्यांचा अमानुष छळ; ६ लाखांची गाडी जप्तवाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये अत्यंत क्रूरपणे ९ गोवंश जनावरे दाटीवाटीने कोंबलेली आढळली. त्यांना चारा-पाण्याची कोणतीही सोय नव्हती. त्यांचे शिंग आणि पाय आखूड दोरखंडाने निर्दयपणे बांधलेले होते. पोलिसांनी ६ लाखांची बोलेरो गाडी, ९० हजारांचे गोवंश आणि मोबाईल असा एकूण ७ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून प्राण्यांवर होणारा छळ प्रतिबंधक कायदा १९६० आणि महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९९५ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.🔥 वरिष्ठ अधिकारी आता तरी कारवाईचा बडगा उगारणार का?तस्करांचे धागेदोरे थेट भंडारा जिल्ह्यातील मोहाडी आणि वरठी तालुक्यांशी जोडलेले आहेत. आरोपी आणि वाहन मालक हे याच भागातील रहिवासी आहेत. स्थानिक पोलीस उपनिरीक्षक आणि वाहतूक शाखेच्या आशिर्वादाशिवाय ही आंतरजिल्हा तस्करी शक्यच नाही, असा थेट आरोप नागरिकांमधून होत आहे.आता या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित पोलीस उपनिरीक्षक (PSI) आणि संशयास्पद कर्मचाऱ्यांवर तात्काळ अंतर्गत चौकशी बसवून कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. ‘खाकी’च्या आडून चालणारा हा काळा धंदा कायमचा बंद होणार की वरिष्ठ अधिकारी याकडे पाठ फिरवणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ही कारवाही वडोदा पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री.मनोज गदादे साहेब यांचे मार्गदर्शनात पी. एस. आय.श्री.महेश बोथले,HC दिपक दरोडे, प्रणयसिंग बनाफर,PC अतुल निंबार्ते,नितीन सार्वे, शुभम ईश्वरकर यांचे चमूने ही कारवाही यशस्वी रित्या पार पाडली.
नागपुर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार
