घरफोडी करणारे ३ आरोपी जेरबंद; २.५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

घरफोडी करणारे ३ आरोपी जेरबंद; २.५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

 

गोंदिया (प्रतिनिधी):

गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई करत घरफोडी आणि वाहन चोरी करणाऱ्या ३ आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून एकूण २ लाख ५१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यामुळे रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील ४ गुन्हे, गोंदिया ग्रामीणमधील १ गुन्हे आणि डोंगरगड (छत्तीसगड) येथील १ मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.

 

१० ऑगस्ट २०२६ रोजी रामनगर परिसरातील रहिवासी विलास कवडू बोरकर यांनी घरात चोरी झाल्याची तक्रार दिली होती. चोरट्यांनी त्यांच्या घरातून रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने आणि एक टॅबलेट चोरून नेला होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला.

तपासादरम्यान, गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी रामनगर बालाघाट टी पॉइंटजवळ सापळा रचला. तेथून पोलिसांनी ३ संशयितांना चोरीच्या मोटारसायकलसह ताब्यात घेतले.

 

अटक केलेले आरोपी.

१) निखील मेश्राम (रा. यादव चौक, झोपडपट्टी, गोंदिया)

२) स्वप्नील उके (रा. बहुजन चौक, कुंभारे नगर, गोंदिया)

३) एक विधीसंघर्ष बालक (नाबालिक),

 

पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे:

 

रोख रक्कम: ७६,००० रुपये,

रीयलमी कंपनीचा टॅबलेट (किंमत १०,००० रुपये) आणि ३ अँड्रॉइड मोबाईल (किंमत ३५,००० रुपये),सोन्या-चांदीचे दागिने, पिवळ्या धातूचे मणी आणि इतर वस्तू (किंमत सुमारे २०,५०० रुपये),१ हिरो डीलक्स मोटारसायकल (किंमत ५०,००० रुपये) जप्त करण्यात आले.

पुढील तपास आणि कारवाईसाठी आरोपींना रामनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

गोंदिया जिल्हा प्रतिनिधी महादेव शेंडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *