प्रतिबंधीत सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्यावर पारशिवनी पोलिसांची कारवाई, ९२,९१३ रुपयांचा मुद्देमाल जप्त
पारशिवनी पोलीस पथकाने गस्तीदरम्यान कारवाई करत बंदी असलेल्या सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला रंगेहात पकडले असून त्याच्याकडून एकूण ९२,९१३ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध पारशिवनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ११ ऑगस्ट २०२६ रोजी पारशिवनी पोलीस पथक परिसरात गस्त घालत असताना, महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखूची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे नागपूर ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के आणि रामटेक विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनाखाली पारशिवनी पोलिसांनी तात्काळ सापळा रचला. या कारवाईदरम्यान संशयितरीत्या जाणाऱ्या एका दुचाकी चालकाला थांबवून पंचांसमक्ष वाहनाची कसून झडती घेण्यात आली.
झडतीदरम्यान आरोपी कमल सिंह भंवर सिंह (वय ४२ वर्षे, मूळ रा. पटेल कॉलनी, रामनगर, अजमेर, राजस्थान; सध्या रा. बहादुरा, उमरेड रोड, नागपूर) याच्या ताब्यातून १३.७४२ किग्रॅ वजनाचा २२,९१३ रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू आणि ७०,००० रुपये किमतीची दुचाकी असा एकूण ९२,९१३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर आरोपीने मानवी आरोग्यास अपायकारक असलेल्या प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची विक्री करण्याच्या हेतूने वाहतूक केल्याचे आढळल्याने, त्याच्याविरुद्ध पारशिवनी पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा आणि मानके कायदा २००६ तसेच भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांन्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे.
विशेष प्रतिनिधी चंदू मडावी
