भंडारा जिल्हा वाहतूक शाखा ‘सुस्त’ की ‘अंमळ’ सुजाण? तुमसर-मौदा मार्गावर गोवंश तस्करीचा महामार्ग!
भंडारा:
तुमसर पोलिसांनी नुकतीच धडक कारवाई करत १९.२० लाखांच्या मुद्देमालासह अवैध गोवंश वाहतूक करणारा आयशर ट्रक पकडला. या कारवाईने पोलिसांचे कौतुक होत असले, तरी एका गंभीर प्रश्नाने डोके वर काढले आहे. “जी अवैध वाहतूक तुमसर पोलिसांना दिसते, ती जिल्हा वाहतूक शाखा भंडाराच्या उपनिरीक्षकांना का दिसत नाही?” हा प्रश्न आता जिल्ह्यातील सुजाण नागरिकांमधून विचारला जात आहे.
📍 तस्करीचा ‘सेफ रूट’: तुमसर ते मौदा!
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, जिल्हा वाहतूक शाखेच्या हद्दीतील तुमसर – मोहाडी – व्हाया शहापूर मार्ग – मौदा हा रस्ता आता गोवंश तस्करांसाठी मुख्य आणि सुरक्षित मार्ग (Safe Route) बनला आहे. दररोज रात्रीच्या अंधारात किंवा पहाटेच्या सुमारास या मार्गावरून गुरांना निर्दयपणे कोंबून वाहने धावत आहेत.
तुमसर पोलिसांच्या नाकाबंदीत ट्रक (क्र. KL-63/E-74181) सापडतो.
आंध्रप्रदेशातील चालक थेट भंडारा जिल्ह्यात येऊन तस्करी करतो.
मग जिल्हा वाहतूक शाखेचे गस्ती पथक आणि अधिकारी नेमके करतात काय?
❓ हायवेवर डोळेझाक कोणासाठी?
जिल्हा वाहतूक शाखेचे मुख्य कामच रस्त्यावरील अवैध वाहतूक आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे हे आहे. तुमसर पोलिसांनी ज्या निर्दयतेने चालवलेला गोवंश पकडला, त्यावरून हा गोरखधंदा मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे स्पष्ट होते. एवढा मोठा ट्रक जिल्ह्याच्या मुख्य मार्गांवरून प्रवास करतो, तरीही वाहतूक पोलिसांना त्याचा सुगावा न लागणे, हे त्यांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. ही निव्वळ ‘नाकामगिरी’ आहे की यामागे काही ‘अर्थपूर्ण’ डोळेझाक आहे, अशी शंका आता घेतली जात आहे.
🔥 पोलीस अधीक्षकांकडे नजरा!
भंडारा पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन साहेब यांच्या मार्गदर्शनात स्थानिक पोलीस कारवाई करत आहेत. परंतु, जिल्हा वाहतूक शाखेच्या या ढिसाळ कारभारामुळे पोलिसांच्या प्रतिमेला धक्का पोहोचत आहे. या ‘खास’ मार्गावरील अवैध गोवंश तस्करी पूर्णपणे मोडून काढण्यासाठी आता वाहतूक शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून तपास करण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा, तस्करांचे मनोधैर्य अधिक वाढेल यात शंका नाही.
प्रतिक्रिया
” जिल्हा वाहतूक शाखा भंडारा चे पोलीस उपनिरीक्षक श्री पुंडे यांना गोवंश तस्करी आपले जिल्हा वाहतूक शाखा हद्दीतील होत असल्याबाबत प्रतिक्रिया मागितली असता कसल्याही प्रकारचे उत्तर देत नाही.
जिल्हा वाहतूक शाखा उपनिरीशक (श्री. पुंडे ),
भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार
