तालुक्यातील रावळा ते पळासखेडा-टिटवी, जामठी, गोद्री, सावळदबारा घाट या मार्गावरील रस्त्याच्या कामाला आता गती मिळाली असून, या कामाची आमदार अब्दुल सत्तार यांनी

सोयगाव (प्रतिनिधी) प्रतिनिधी संतोष गर्दे

 

दि. १६ : तालुक्यातील रावळा ते पळासखेडा-टिटवी, जामठी, गोद्री, सावळदबारा घाट या मार्गावरील रस्त्याच्या कामाला आता गती मिळाली असून, या कामाची आमदार अब्दुल सत्तार यांनी सार्वजनिक बांधकाम व वन विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत तब्बल साडेसात किलोमीटर पायी चालत पाहणी केली.

 

या रस्त्यासाठी आमदार अब्दुल सत्तार यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्यामुळे २० फेब्रुवारी २०२३ रोजी सदरील रस्त्याच्या कामाला मान्यता मिळाली. त्यानंतर पहिल्या टप्प्यात भूसंपादनाची कार्यवाही पूर्ण करून रस्त्याचे सीमांकन करण्यात आले. या सीमांकनाच्या अंतर्गत आलेल्या भागातील रस्त्याच्या कामासाठी अडथळा ठरणाऱ्या वृक्षांची वृक्षतोड व साफसफाईचे काम सध्या सुरू आहे. त्यानंतर रस्त्याच्या पुढील कामाला सुरुवात होणार असून, त्याच अनुषंगाने सुरू असलेल्या कामाची पाहणी करून आमदार सत्तार यांनी कामाचा आढावा घेतला.

 

डोंगररांगा, चढ-उतार, दऱ्या-खोरे आणि झाडाझुडपांमधून मार्गक्रमण करत आमदार अब्दुल सत्तार यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या कामाची माहिती घेत कामाचा सविस्तर आढावा घेतला.

रस्त्याचे पुढील काम गतीने व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

 

या संपूर्ण रस्त्याचा भाग वन विभागाच्या अखत्यारित येत असल्याने वन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थित राहून सुरू असलेल्या वृक्षतोड, साफसफाई, सीमांकन तसेच पुढील कामाच्या प्रक्रियेबाबत आमदार अब्दुल सत्तार यांना माहिती दिली.

 

विशेष म्हणजे, वयाच्या ६४ व्या वर्षीही आमदार अब्दुल सत्तार यांनी साडेसात किलोमीटरचा हा दुर्गम डोंगराळ भाग पायी पार करत कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांच्या या पाहणीदरम्यान कामाच्या प्रत्येक टप्प्याची त्यांनी बारकाईने माहिती घेतली.

 

पाहणीचा समारोप पळासखेडा येथे झाला. यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून रस्त्याच्या कामाबाबत माहिती दिली. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर परिसरातील १२ गावांच्या दळणवळणाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार असून, नागरिकांना बाजारपेठ, शिक्षण, आरोग्य व इतर आवश्यक सुविधांपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ होणार आहे.

 

यावेळी जामनेरचे वनपरिक्षेत्र अधिकारी सूरज आवारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता ब्रह्मानंद तायडे, कनिष्ठ अभियंता प्रमोद राठोड, वनपाल समाधान धनवट, वनरक्षक कुणाल जाधव यांच्यासह जि.प. सदस्य देविदास पालोदकर, केशवराव तायडे, शिवप्पा चोपडे तालुकाप्रमुख धरमसिंग चव्हाण, शिवप्पा चोपडे, सांडू तडवी, विशाल चव्हाण, श्रावण राठोड, महेश राठोड, गणेश खैरे, गुलाबसिंग राणा, हिरा चव्हाण, तागू चव्हाण, राधेश्याम जाधव, गणेश उखा, रतन सुरवाडे, गंगाधर सदाशिवे, फिरोज पठाण, शेख जाकेर, रईस पठाण, किसन सूर्यवंशी, अनिल पाटील, मोहन सुरडकर, शेख फिरोज आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *