मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर ४० वर्षांची प्रतीक्षा संपण्याच्या मार्गावर!
सायगाव प्रतिनिधी संतोष गर्दे
गोद्री–पळसखेडा–टिटवी–सावळदबारा रस्त्याच्या साफसफाईच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात
सोयगाव : गेल्या सुमारे ४० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गोद्री–पळसखेडा–टिटवी–सावळदबारा या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या कामाला अखेर गती मिळाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या निर्देशानंतर संबंधित विभागाने आवश्यक कार्यवाही सुरू केली असून, आज वन विभागाच्या माध्यमातून रस्त्याच्या साफसफाईच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
सुमारे तीन महिन्यांपूर्वी भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिसजी मुलतानी, सोयगाव पंचायत समितीचे सभापती उत्तम चव्हाण आणि पंचायत समिती सदस्य राहुल राठोड यांनी या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी संपूर्ण मार्गावर पायी प्रवास करत पाहणी व सर्वेक्षण केले होते. रस्त्याची वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेण्यात आली. यावेळी रस्त्याबाबत सविस्तर निवेदन साद करून गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाला तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
गोद्री ते पळसखेडा हा मार्ग वनक्षेत्रातून जात असल्यामुळे वन विभागाच्या आवश्यक मंजुरीअभावी या रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडले होते. स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींकडून सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येत होता. अनेकदा भूमिपूजन व उद्घाटन झाले; मात्र विविध प्रशासकीय अडचणींमुळे प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊ शकली नव्हती.
मात्र मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या निर्देशानंतर प्रशासनाने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत आवश्यक प्रक्रिया वेगाने पूर्ण केली. वन विभागाची मंजुरी मिळाल्यानंतर आता रस्त्याच्या साफसफाईच्या कामाला सुरुवात झाली असून, या बहुप्रतीक्षित रस्त्याच्या प्रत्यक्ष निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे.
बारा गावांसाठी ठरणार जीवनवाहिनी
गोद्री–पळसखेडा–टिटवी–सावळदबारा हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर सावळदबारा परिसरातील सुमारे बारा गावांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः जामठी व परिसरातील नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
रस्ता पूर्ण झाल्यानंतर प्रवासाचे अंतर आणि वेळ मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार असून, शिक्षण, आरोग्य, शेतीमालाची वाहतूक, व्यापार-व्यवसाय आणि दैनंदिन दळणवळण अधिक सुलभ होणार आहे. त्यामुळे या संपूर्ण परिसराच्या विकासाला नवी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण करण्याच्या दिशेने ठोस पाऊल
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांदरम्यान परिसरातील नागरिकांना या रस्त्याच्या कामाचे आश्वासन देण्यात आले होते. नागरिकांनी दाखविलेला विश्वास आणि दिलेले आश्वासन पूर्ण करण्याच्या उद्देशाने या रस्त्यासाठी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करण्यात आला.
या पाठपुराव्याला मंत्री गिरीशजी महाजन, मंत्री अतुलजी सावे, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि रामेश्वर नाईक यांच्यासह विविध नेतेमंडळींचे वेळोवेळी सहकार्य लाभले. त्यांच्या सहकार्यामुळे तसेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सकारात्मक निर्देशामुळे आज या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
या महत्त्वपूर्ण कामासाठी सहकार्य करणारे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मंत्री गिरीशजी महाजन, मंत्री अतुलजी सावे, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, रामेश्वर नाईक तसेच संबंधित सर्व विभागांचे अधिकारी व प्रशासन यांचे भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिसजी मुलतानी, जिल्हा परिषद सदस्य माहीम मुलतानी, सोयगाव पंचायत समितीचे सभापती उत्तम चव्हाण आणि पंचायत समिती सदस्य राहुल राठोड यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.
४० वर्षांपासून प्रलंबित असलेला हा रस्ता आता प्रत्यक्ष कामाच्या दिशेने पुढे सरकल्याने सावळदबारा परिसरातील नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या असून, हा रस्ता परिसराच्या विकासाची नवी जीवनवाहिनी ठरणार आहे.
