नागपूर ग्रामीण पोलीस दलात कामकाज गतिमान करण्यासाठी संगणक व मनुष्यबळ वाढविण्याचे आदेश; वरिष्ठ पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार यांनी घेतली ‘सर्व कर्मचारी संवाद बैठक’
नागपूर ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय तसेच पोलीस मुख्यालय येथील अधिकारी, अंमलदार आणि मंत्रालयीन कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आणि कामकाजाला गती देण्यासाठी पोलीस भवन येथे वरिष्ठ पोलीस अधीक्षक श्री. हर्ष ए. पोद्दार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ‘सर्व कर्मचारी संवाद बैठक’ संपन्न झाली. या बैठकीमध्ये पोलीस दलातील दैनंदिन कामकाजातील विविध मुद्दे, कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि कार्यपद्धती सुधारण्यासाठी नवनवीन संकल्पनांवर सखोल चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान विविध शाखांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. पोलीस विभागाचे दैनंदिन कामकाज अधिक गतिमान आणि कार्यक्षम व्हावे यासाठी आवश्यक त्या शाखांना तातडीने संगणक व स्कॅनर उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांनी दिले. यासोबतच शाखा आणि कार्यालयांच्या कामकाजाच्या स्वरूपानुसार आवश्यक असलेल्या अतिरिक्त मनुष्यबळाबाबत चर्चा करून मनुष्यबळात वाढ करण्याचे आदेशही देण्यात आले.
वरिष्ठ पोलीस अधीक्षक श्री. हर्ष ए. पोद्दार यांनी सर्व अधिकारी व अंमलदारांच्या सूचना गांभीर्याने ऐकून घेतल्या. पोलीस दलातील विविध पदांवरील कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा लाभ घेत अडचणींवर योग्य उपाय शोधणे, उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर करणे, पोलीस दलात शिस्त व समन्वय राखणे आणि संपूर्ण विभागाची कार्यक्षमता वाढविणे याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. या महत्त्वपूर्ण संवाद बैठकीस अपर पोलीस अधीक्षक श्री. अनिल म्हस्के, पोलीस उपअधीक्षक (गृह) श्रीमती पुजा गायकवाड यांच्यासह सर्व शाखांचे प्रभारी अधिकारी, अंमलदार आणि पोलीस मुख्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विशेष प्रतिनिधी चंदू मडावी
