स्थानिक गुन्हे शाखेचा धडाका;गोंदिया जिल्ह्यात गुन्हेगारांवर कारवाई
गोंदिया, दि. १७ सप्टेंबर : गोंदिया जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत १६ सप्टेंबर रोजी विविध स्वरूपाच्या गुन्ह्यांची तसेच आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अपघाती मृत्यू, अवैध वाळू वाहतूक, मारहाण, अपहरण, वाहतूक नियमांचे उल्लंघन, गोवंशाची विनापरवाना वाहतूक आणि मद्यपान करून वाहन चालविणे अशा प्रकरणांचा यात समावेश आहे.
तिरोडा येथे रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला मोटारसायकल धडकल्याने अजित गुलाब उपाशे यांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. तसेच देवरी परिसरात अज्ञात वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने जयपाल चमरू राऊत यांचा मृत्यू, तर विनोद राऊत जखमी झाल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद आहे.
जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीविरोधातही विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली. डुग्गीपार, रावणवाडी आणि तिरोडा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वाळू चोरी व विनापरवाना वाहतुकीची प्रकरणे नोंदवून ट्रॅक्टर-ट्रॉली, टिपर तसेच वाळू असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रावणवाडी येथील एका कारवाईत सुमारे १५ लाख १२ हजार रुपयांचा, तर इतर प्रकरणांत प्रत्येकी सुमारे ६ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचे नमूद आहे.
गोंदिया शहरात किरकोळ वादातून सुरज अर्जुन सागर यांना लोखंडी कड्याने मारून जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिरोडा येथे एका व्यक्तीच्या अपहरणाची तक्रार नोंदविण्यात आली असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
गोरेगाव येथे वाहनातून १३ गोवंशीय जनावरे विनापरवाना कत्तलीसाठी नेली जात असल्याच्या संशयावरून प्रकरण दाखल करण्यात आले आहे. जनावरे वाहनात दाटीवाटीने बांधलेली असून, त्यांच्यासाठी चारा व पाण्याची व्यवस्था नसल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद आहे.
डुग्गीपार पोलीस ठाण्याच्या हद्दीत मद्यपान करून वाहन चालविण्याची दोन स्वतंत्र प्रकरणे नोंदविण्यात आली. ब्रेथ अॅनालायझर तपासणीत अनुक्रमे ३०४.०८ आणि ८१.०० मिग्रॅ/१०० मिली अल्कोहोलचे प्रमाण आढळल्याचे नमूद आहे.
अर्जुनी/मोर येथे धोकादायक पद्धतीने मोटारसायकल चालविल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला. रामनगर परिसरात सार्वजनिक रस्त्यावर बस उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली असून, आरोपीस नोटीस देण्यात आली आहे.
दरम्यान, सालेकसा येथे विष प्राशन केल्यानंतर उपचारादरम्यान योगराज सिताराम पागोटे (वय ४४) यांचा मृत्यू झाल्याची आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, या घटनेची चौकशी सुरू असल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद आहे.
गोंदिया जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवाव
गोरेगांव तालुका प्रतिनिधि महादेव शेन्डे
