तुमसरमधील कुख्यात गुंड ‘डिकरा’ म्हालगावेवर MPDA अंतर्गत कारवाई; नागपूर कारागृहात रवानगी

तुमसरमधील कुख्यात गुंड ‘डिकरा’ म्हालगावेवर MPDA अंतर्गत कारवाई; नागपूर कारागृहात रवानगी

 

तुमसर (भंडारा):

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी भंडारा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तुमसर येथील अभ्यंकर नगर भागातील कुख्यात आणि खतरनाक गुंड आकाश उर्फ डिकरा रमेश म्हालगावे (वय ३०) याच्यावर एम.पी.डी.ए. (MPDA) कायद्यान्वये कारवाई करून त्याची मध्यवर्ती कारागृह नागपूर येथे रवानगी करण्यात आली आहे.

 

गुन्हेगारी वर्चस्व संपवण्यासाठी पाऊल

आकाश उर्फ डिकरा हा गेल्या २०२० पासून गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय होता. त्याच्यावर खून, मारहाण, सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळणे, शिवीगाळ करणे, तसेच बेकायदेशीर अग्निशस्त्र आणि घातक हत्यारे बाळगून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे तुमसर परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती.

 

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आणि पोलीस कारवाई

या सराईत गुन्हेगाराच्या कारवायांना आळा घालण्यासाठी तुमसर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार केला होता. भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. सावन कुमार यांनी १८ सप्टेंबर रोजी या प्रस्तावाला मंजुरी देत आरोपीला नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश जारी केले.

 

ही धडक कारवाई भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री. निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये तुमसरचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. शिवम विसापुरे, तुमसर चे पोलीस निरीक्षक सुभाष बारसे, उपनिरीक्षक प्रवीण सयाम आणि तुमसर पोलीस ठाण्याच्या अंमलदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

 

भंडारा पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, जिल्ह्यातील सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या इतरही रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर आगामी काळात अशीच कडक कारवाई केली जाईल.

भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *