तिष्टी खुर्द शिवारात वीज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; गुरे चारण्यासाठी गेले असताना घडली दुर्दैवी घटना
कळमेश्वर / मोहपा :
कळमेश्वर तालुक्यातील तिष्टी खुर्द शेत शिवारात शनिवारी दुपारी वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसात अंगावर वीज पडल्याने दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. टिबुराज राजेराम कानफाडे (वय ६४ वर्षे) आणि लक्ष्मण घनश्याम कानफाडे (वय ५३ वर्षे) अशी मृत शेतकऱ्यांची नावे आहेत. हे दोघेही नात्याने चुलत भाऊ होते. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार, दि. १९/०९/२०२६ रोजी सकाळी दोघेही आपली गुरेढोरे घेऊन तिष्टी खुर्द शिवारातील पडाणात चारण्यासाठी गेले होते. दुपारी अंदाजे ३:०० वाजताच्या सुमारास परिसरात अचानक ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला. पावसापासून बचाव करण्यासाठी ते दोघेही शिवारातील माता माय मंदिरात थांबले होते. याच दरम्यान मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या कडुनिंबाच्या झाडावर अचानक आकाशीय वीज कोसळली. विजेचा तीव्र धक्का बसल्यामुळे दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला.
सायंकाळ उलटूनही दोघे घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी शिवारात त्यांचा शोध सुरू केला. रात्री अंदाजे ९:०० वाजताच्या सुमारास गावातील राजू आसोले यांना शिवारात गुरे मोकाट चरताना दिसली. त्यांनी मंदिरात जाऊन पाहिले असता दोघेही तिथे मृतावस्थेत आढळून आले.
या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली. मृत टिबुराज कानफाडे यांचे सुपुत्र नामदेव कानफाडे यांनी मोहपा पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी घटनेची नोंद केली असून, मोहपा पोलीस स्टेशनचे ठाणेदार ईश्वर हनवते या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
विशेष प्रतिनिधी चंदू मडावी
