*जादूटोण्याच्या संशयातून रविशंकर रहांगडाले यांची हत्या*
* आरोपी ताब्यात; दोन विधिसंघर्ष बालकांचा सहभाग असल्याची पोलिसांची माहिती
गोंदिया, दि. २४ सप्टेंबर : मुंडीपार (एमआयडीसी) परिसरातील रविशंकर उदेलाल रहांगडाले (वय ५८) यांच्या खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या २४ तासांत उलगडा केल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिली. या प्रकरणात जितेंद्र कोहळे (वय ४५) आणि कमलेश अशोक नेवारे (वय १९), दोघेही रा. टॉवरटोली, मुंडीपार यांना ताब्यात घेण्यात आले असून, दोन विधिसंघर्ष बालकांचा सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविशंकर रहांगडाले हे २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ७.४५ वाजता मुंडीपार येथील घरातून एमआयडीसी परिसरातील व्यंकटेश राईस मिल येथे रात्रीच्या पाळीच्या कामासाठी मोटारसायकलने निघाले होते. दरम्यान, चमडा फॅक्टरीजवळील रस्त्यावर अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यावर धारदार हत्याराने वार करून त्यांची हत्या केली.
याप्रकरणी त्यांचा मुलगा विक्की रविशंकर रहांगडाले यांच्या तक्रारीवरून गंगाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४७०/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०३(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, मृतक जादूटोणा करत असल्याची गावात चर्चा होती. त्यामुळे काही व्यक्तींमध्ये त्यांच्याबद्दल रोष असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कमलेश नेवारे याला ताब्यात घेऊन चौकशी केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, मृतकाच्या कथित जादूटोण्यामुळे आपल्या कुटुंबातील दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्याचा तसेच काही कुटुंबांतील व्यक्तींच्या मृत्यू व आजारपणासही मृतक जबाबदार असल्याचा संशय कमलेश नेवारे याने व्यक्त केला. याच संशयातून कमलेश नेवारे, जितेंद्र कोहळे आणि दोन विधिसंघर्ष बालकांनी रविशंकर रहांगडाले यांच्या हत्येचा कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांच्या माहितीनुसार, २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी आरोपी एमआयडीसी रोडवर थांबले होते. रविशंकर रहांगडाले मोटारसायकलने जात असताना त्यांचा पाठलाग करून चमडा फॅक्टरीजवळ त्यांना अडविण्यात आले. त्यानंतर हातोड्याने मारहाण करून त्यांना खाली पाडण्यात आले आणि कुऱ्हाडीने डोक्यावर वार करून त्यांची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी गंगाझरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, तिरोडा उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन गुल्हाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, सायबर सेल आणि गंगाझरी पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.
गोंदिया जिल्हा प्रतिनिधी महादेव शेन्डे
