एमडी पावडरचे व्यसन लावून विवाहितेवर अत्याचार; दोघांवर गुन्हा दाखल

*एमडी पावडरचे व्यसन लावून विवाहितेवर अत्याचार; दोघांवर गुन्हा दाखल*

 

 

खापरखेडा पोलिसांनी २२ वर्षीय विवाहितेला एमडी पावडरचे व्यसन लावून तिचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी दोन युवकांवर गंभीर गुन्हा दाखल केला आहे. अनुराग कटारिया (वय २५) आणि आशीष शास्त्री (वय २५, दोघे रा. दहेगाव रंगारी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. संगणक प्रशिक्षण वर्गादरम्यान ओळख वाढवून आरोपींनी पीडितेला विविध ठिकाणी नेले आणि तिला अमली पदार्थ देऊन तिच्या बेशुद्धावस्थेचा गैरफायदा घेत वारंवार अत्याचार केला.

पीडितेच्या तक्रारीनुसार, आरोपींनी तिला इतर व्यक्तींशीही शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. तसेच पतीला झोपेच्या गोळ्या देण्याची सक्ती करून, विरोध केल्यास पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. स्वतःच्या व पतीच्या जिवाला धोका निर्माण झाल्याने विवाहितेने सावनेर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानंतर घटनास्थळ खापरखेडा पोलीस हद्दीत असल्याने हा गुन्हा शून्य क्रमांकाने खापरखेडा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.

खापरखेडा पोलिसांनी १३ जुलै रोजी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक प्रियंका पाटील पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, तक्रारीत एमडी पावडरचा स्पष्ट उल्लेख असूनही प्राथमिक गुन्ह्यात अमली पदार्थ प्रतिबंधक कलमांचा समावेश नसल्याने, आगामी तपासात पोलीस अमली पदार्थाच्या स्रोताचा शोध घेऊन कलमवाढ करणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

विशेष प्रतिनिधी चंदू मडावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *