विकासाला विरोध करणाऱ्या विषारी आणि अविचारी प्रवृत्ती इतिहासजमा होतील*
— आमदार डॉ. आशिषराव देशमुख
• *माफियाराजाला थारा नाही; सावनेरची रामराज्याकडे वाटचाल*
• दसरा मेळाव्यात आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांचा विकासकामांवर भर; औद्योगिकीकरणातून युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा निर्धार.
सावनेर, दि. २० ऑक्टोबर २०२६ : विजयादशमीच्या पावन पर्वावर सावनेर नगरपरिषद मैदानावर आयोजित दसरा मेळाव्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यावेळी आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांनी विकास, कायदा व सुव्यवस्था, रोजगारनिर्मिती आणि औद्योगिकीकरणाच्या माध्यमातून सावनेर-कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचा कायापालट करण्याचा निर्धार व्यक्त केला. “अहंकाराचा त्याग करून दुष्प्रवृत्तींचा नाश करणे आणि लोककल्याणकारी कारभारातून रामराज्याच्या दिशेने वाटचाल करणे, हाच दसऱ्याचा खरा संदेश आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले.
मेळाव्याच्या प्रारंभी नगरसेवक मंदार मंगळे यांनी आमदार डॉ. देशमुख यांच्या गेल्या दोन वर्षांतील विकासकामांचा उल्लेख केला. यामध्ये १०० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना, आठ कोटी रुपयांचे अत्याधुनिक वाचनालय, नमो उद्यान आणि इतर विकासकामांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
माफियाराज आणि अवैध धंद्यांना थारा नाही; कायदा-सुव्यवस्थेला प्राधान्य
उपस्थित नागरिकांना कुटुंबाचा भाग मानत आमदार डॉ. देशमुख म्हणाले की, सावनेर-कळमेश्वर परिसरात शांतता, सुरक्षितता आणि कायद्याचे राज्य प्रस्थापित करणे ही आपली प्राथमिकता आहे. पूर्वीच्या काळात अवैध धंदे, गुन्हेगारी प्रवृत्ती आणि तरुणांना चुकीच्या मार्गावर नेणाऱ्या प्रकारांबाबत नागरिकांना चिंता होती. अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पोलिस यंत्रणा सक्षम करणे आवश्यक आहे.
याच उद्देशाने मोहपा येथे नवीन पोलीस ठाणे कार्यान्वित करण्यात आले असून, खापरखेडा पोलीस ठाणे नागपूर ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारीत वर्ग करण्यात आल्याचा उल्लेख त्यांनी केला. समाजात शांतता, सुरक्षितता आणि कायद्याबद्दल आदर निर्माण झाला पाहिजे. विकासाच्या मार्गात अडथळे निर्माण करणाऱ्या अविचारी प्रवृत्तींना जनहिताच्या कामांमधून उत्तर दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
६,४०० एकरांतील औद्योगिक विकासातून रोजगारनिर्मितीचे स्वप्न
सावनेर तालुक्यात सुमारे ६,४०० एकर क्षेत्रावर प्रस्तावित औद्योगिक विकासाच्या माध्यमातून मध्य भारतातील महत्त्वाच्या औद्योगिक केंद्रांपैकी एक उभारण्याचे उद्दिष्ट असल्याचे आमदार डॉ. देशमुख यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होईल आणि परिसरातील आर्थिक व्यवहारांना चालना मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
“माझ्याकडे येणाऱ्या नागरिकांपैकी मोठा वर्ग रोजगाराच्या अपेक्षेने येतो. युवकांच्या हाताला काम देणे हे माझे कर्तव्य आहे. मागील अनेक वर्षांत औद्योगिक विकासाला अपेक्षित गती मिळाली नाही; आता नव्या संधी निर्माण होत असताना त्यांना विरोध करण्याऐवजी स्थानिक नागरिकांचे हित लक्षात घेतले पाहिजे,” असे ते म्हणाले.
औद्योगिकीकरणाला विरोध करणाऱ्या राजकीय भूमिका आणि विकासकामांबाबत पसरवल्या जाणाऱ्या गैरसमजांवर टीका करताना त्यांनी सांगितले की, विकासाच्या संधींबाबत नागरिकांनी वस्तुस्थिती समजून घ्यावी. जनहिताच्या कामांना अडथळे निर्माण करणाऱ्या अविचारी प्रवृत्ती काळाच्या ओघात इतिहासजमा होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा, ही भूमिका
औद्योगिक प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाष्य करताना आमदार डॉ. देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देण्याची भूमिका मांडली. त्यांच्या म्हणण्यानुसार, कोरडवाहू जमिनीसाठी प्रति एकर ३२ लाख रुपये, बागायती जमिनीसाठी ४६ ते ४८ लाख रुपये आणि फळबागांसाठी ६४ ते ६५ लाख रुपयांपर्यंत मोबदल्याची तरतूद अपेक्षित आहे.
“जमीन ही शेतकऱ्यांसाठी भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची असते. त्यामुळे त्यांची वेदना समजून घेणे आवश्यक आहे. कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ नये आणि त्यांना योग्य मोबदला मिळावा, यासाठी मी गरज पडल्यास आंदोलनही करेन,” असे त्यांनी सांगितले.
औद्योगिक विकासामुळे स्थानिक शेतकरी कुटुंबे, युवक आणि पुढील पिढ्यांना लाभ मिळावा, तसेच प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांचे योग्य निराकरण व्हावे, यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
बुद्धवन, न्यायमंदिर आणि नागरी सुविधांवर भर
सामाजिक सलोखा आणि शांततेचा संदेश देण्यासाठी मोहपा परिसरात रामगिरीजवळ गौतम बुद्धांची भव्य मूर्ती आणि बुद्धवन उभारण्याचा उपक्रम हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले. सावनेर येथे न्यायमंदिरासाठी ४४ कोटी रुपयांची नवीन इमारत मिळाल्याचाही त्यांनी उल्लेख केला.
याशिवाय गावोगावी वाचनालये, नागरिकांसाठी व्यायामशाळा, स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी आरओ सुविधा आणि पाणीटंचाई निवारणासाठी नियोजन यांसारख्या उपक्रमांवर भर दिला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देणे आणि रुग्णांना रुग्णालयात पोहोचण्यासाठी रुग्णवाहिका सुविधा सुरू करणे अशा उपक्रमांचाही त्यांनी उल्लेख केला.
कळमेश्वर येथे विदर्भातील भव्य भारतीय राष्ट्रध्वज उभारण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. विकासासोबत सामाजिक बांधिलकी, सांस्कृतिक वारसा आणि राष्ट्रीय एकात्मता जपण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
“सावनेर-कळमेश्वरच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध”
“सावनेर-कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचा विकास करण्यासाठी मी दिवस-रात्र मेहनत घेत आहे. पाणीटंचाई, रोजगार, औद्योगिकीकरण आणि मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर सातत्याने काम केले जाईल. विकासाच्या माध्यमातून नागरिकांचे जीवनमान उंचावणे आणि युवकांना त्यांच्या घराजवळ रोजगार उपलब्ध करून देणे हेच माझे ध्येय आहे,” असे आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांनी सांगितले.
विजयादशमी हा सत्याचा असत्यावर आणि चांगल्या प्रवृत्तींचा वाईट प्रवृत्तींवर विजय मिळविण्याचा संदेश देणारा सण आहे. याच संदेशातून सावनेर-कळमेश्वरमध्ये विकास, शांतता, सुरक्षितता आणि समृद्धीचे नवे पर्व सुरू करण्याचा संकल्प या दसरा मेळाव्यात व्यक्त करण्यात आला.याप्रसंगी आमदार डॉ. राजीव पोतदार, मनोहर कुंभारे, रामराव मोवाडे, नगराध्यक्ष संजना मंगळे, राजू घुगल योगिता घोरमारे,बंडू दिवटे आदी नगरसेवक अन्य उपस्थित होते.
विशेष प्रतिनिधी चंदू मडावी
