मृत्यूही ‘त्यांना’ वेगळा करू शकला नाही; सिल्लोड तालुक्यात पतीच्या निधनांनंतर ‘तिने’ही सोडला प्राण!

सिल्लोड / प्रतिनिधी : चाळीस वर्षांच्या संसारात सुख-दुःखाच्या प्रत्येक क्षणाला पतीला भक्कम साथ देणाऱ्या पत्नीने पतीच्या मृत्यूनंतर अवघ्या काही तासांतच प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना सिल्लोड तालुक्यातील केऱ्हाळा येथे घडली. रावसाहेब अमृता पांढरे (६५) आणि रत्नकलाबाई रावसाहेब पांढरे (६०) असे एकापाठोपाठ प्राण सोडलेल्या दाम्पत्याचे नाव आहे.
दम्याचा आजार असलेल्या रावसाहेब पांढरे यांना त्रास होऊ लागल्याने २९ जानेवारी रोजी उपचारासाठी दवाखान्यात हलवण्यात येत होते. मात्र, वाटेचं त्यांची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केल्यानंतर त्यांचे पार्थिव घरी आणण्यात आले. हे पाहून त्यांच्या पत्नी रत्नकलाबाई यांना धक्का बसला आणि त्यांना भोवळ आली. यामुळे त्यांना तत्काळ सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, प्रकृती खालावल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, पतीच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने त्यांच्या मेंदूतील नस फाटली आणि त्यातच शनिवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.
शुक्रवारी रावसाहेब पांढरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या चितेची राख थंड होत नाही तोच कुटुंबियांवर रत्नकलाबाई यांच्यावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. पतीच्या निधनापाठोपाठ काही तासांतच पत्नीनेही प्राण सोडल्याने गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त होत होती. पांढरे दाम्पत्याच्या पश्चात मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *