कात्रज दूध संघाला ‘अजितदादा पवार’ यांचे नाव देण्याचा ऐतिहासिक ठराव
धनकवडी (पुणे) :
पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (कात्रज) याचे नामकरण ‘अजितदादा पवार पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, कात्रज’ असे करण्याचा ऐतिहासिक निर्णय संघाच्या संचालक मंडळाने सर्वानुमते घेतला आहे.
सहकार चळवळीच्या बळकटीसाठी आणि पुणे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी अजितदादा पवार यांनी वेळोवेळी दिलेले मार्गदर्शन, पाठबळ आणि सहकार्य लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती संघाकडून देण्यात आली आहे. संघाच्या विस्तारासाठी, प्रशासकीय समन्वयासाठी तसेच संस्थात्मक उभारणीसाठी पवार यांचे योगदान महत्त्वाचे ठरले असल्याचे संचालकांनी नमूद केले.
पवार कुटुंबाचे सहकार चळवळीला आणि कात्रज दूध संघाच्या विविध उपक्रमांना सातत्याने सहकार्य मिळत आले असून, त्या योगदानाचा सन्मान म्हणून हे नामकरण करण्यात येत असल्याचे संघाने स्पष्ट केले. हा निर्णय केवळ नाव बदलापुरता मर्यादित नसून, सहकार क्षेत्रासाठी योगदान देणाऱ्या नेतृत्वाचा गौरव आणि पुढील पिढ्यांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न असल्याचेही संघाकडून सांगण्यात आले.
हा ठराव संघाचे अध्यक्ष ॲड. स्वप्निल ढमढेरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत मांडण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष तानाजी जगताप यांच्यासह संचालक गोपाळराव म्हस्के, विष्णू हिंगे, बाळासाहेब नेवाळे, बाळासाहेब खिलारी, केशरताई पवार, भगवान पासलकर, दिलीप थोपटे, राहुल दिवेकर, भाऊसाहेब देवाडे, अरुण चांभारे, कालिदास गोपाळघरे, निखिल तांबे, लताताई गोपाळे, चंद्रकांत भिंगारे आदी उपस्थित होते. सर्व संचालकांनी या निर्णयाला एकमताने मंजुरी दिली.
नामकरणासंदर्भातील आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया आणि परवानग्यांची कार्यवाही संबंधित पातळीवर लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे संघाने स्पष्ट केले आहे.
— दत्तात्रय ठोंबरे
सीटी इंडिया न्यूज, पुणे
