भंडारा जिल्हा परिषद शाळांतील ७६७ रिक्त पदे तात्काळ भरा – खा. डॉ. प्रशांत पडोळे यांची मागणी
शिक्षण सभापती नरेश ईश्वरकर यांच्या साखळी उपोषणाला खासदारांचा जाहीर पाठिंबा; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा
भंडारा :
भंडारा जिल्हा परिषद शाळांमध्ये सुमारे ७६७ शिक्षक व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत असल्याची बाब समोर आली आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती नरेश ईश्वरकर यांनी रिक्त पदे तात्काळ भरण्याच्या मागणीसाठी साखळी उपोषण आंदोलन सुरू केले आहे.
या आंदोलनाची दखल घेत भंडारा–गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी जिल्हाधिकारी भंडारा यांना पत्र पाठवून जिल्हा परिषद शाळांमधील ७६७ रिक्त पदांची भरती तातडीने करण्याची मागणी केली आहे. तसेच सुरू असलेल्या साखळी उपोषणाला त्यांनी जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.
खासदार पडोळे यांनी प्रशासनाला आवाहन करताना सांगितले की, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आणि शिक्षण व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी तातडीने सकारात्मक निर्णय घेणे अत्यंत आवश्यक आहे. सध्या सुरू असलेल्या आंदोलनाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन शिक्षण विभागातील रिक्त पदे भरण्याबाबत त्वरीत कार्यवाही करावी, असेही त्यांनी नमूद केले आहे.
“भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. जिल्हा परिषद शाळांमधील ७६७ रिक्त पदे तात्काळ भरून शिक्षण व्यवस्था सक्षम करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे.”
— डॉ. प्रशांत पडोळे, खासदार, भंडारा–गोंदिया लोकसभा मतदारसंघ
भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार
