पोहरादेवी मार्ग दहिसावळी शिवारात अवैध कारवाई की पठाणी वसुली?
७ ते ८ टिप्पर आडवून प्रति टिपर १०हजारांची मंडळ अधिकाऱ्याकडून उघड लूट!
यवतमाळ प्रतिनिधी एस के शब्बीर महागांव
पोहरादेवी मार्ग दहिसावळी रुग्णालय शिवारात घडलेली ताजी घटना सध्या संपूर्ण परिसरात संतापाची लाट निर्माण करणारी ठरली आहे. अवैध रेती वाहतूक रोखण्याच्या नावाखाली मंडळ अधिकारी येकूलवार व भगत पटवारी यांनी ८ टिप्पर अडवून प्रत्येकी 10 हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे ही कारवाई खरंच कायद्याच्या चौकटीत होती की सरळ सरळ ‘पठाणी वसुली’ होती, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दहिसावळी शिवारातून रेती वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळताच संबंधित अधिकाऱ्यांनी अचानक कारवाई करत एकूण ८टिप्पर अडवले. मात्र, पुढे कायद्याप्रमाणे जप्ती व दंडात्मक प्रक्रिया करण्याऐवजी, प्रत्येक टिप्पर चालकाकडून 10हजार रुपये घेऊन वाहने सोडण्यात आल्याचा आरोप आहे. रॉयल्टी देणे 23 तारखेपासून बंद असून याचाच फायदा घेत मंडळ अधिकारी येलकुलवार व भगत यांनी याचाच मुद्दा धरून पठाणी वसुली केली या प्रकारामुळे शासनाच्या महसुलाला मोठा फटका बसला असून, अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशयाचे ढग दाटले आहेत.
स्थानिकांच्या मते, जर ही कारवाई अधिकृत होती, तर संबंधित टिप्परवर दंड आकारून त्याची नोंद महसूल खात्यात व्हायला हवी होती. मात्र, रोख स्वरूपात पैसे घेऊन वाहने सोडल्याने संपूर्ण प्रकरण संशयास्पद ठरत आहे. “कारवाईच्या नावाखाली उघड लूट चालू आहे का?” असा संतप्त प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.
या प्रकरणामुळे प्रशासनाची प्रतिमा मलीन झाली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा, अशा प्रकारच्या घटनांना आळा बसणार नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणण्याची गरज असून, दोषींवर गुन्हे दाखल करून निलंबनासह कडक कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. दहिसावळीतील ही घटना केवळ एक उदाहरण असून, अशा ‘पठाणी वसुली’च्या प्रकारांवर लगाम लावण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलणे अत्यंत गरजेचे बनले आहे.
