नागपूर ग्रामीण पोलीस दलाचा राज्यात गौरव, ई-प्रशासन सुधारणा कार्यक्रमात पटकावला द्वितीय क्रमांक
मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे २८/०३/२०२६ रोजी आयोजित विशेष सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर ग्रामीण पोलीस दलाचा गौरव करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवसांच्या ई-प्रशासन सुधारणा कार्यक्रमात नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाने संपूर्ण राज्यातून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. भारतीय गुणवत्ता परिषदेमार्फत झालेल्या मूल्यांकनात नागपूर ग्रामीणला २०० पैकी १६१ गुण मिळाले आहेत.
प्रशासनात पारदर्शकता आणि वेग आणण्यासाठी नागपूर ग्रामीण पोलिसांनी संकेतस्थळ, आपले सरकार प्रणाली आणि संगणकीय कार्यालय अशा आधुनिक सुविधांचा वापर करून १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण केले. १०० आणि १५० दिवसांच्या दोन्ही ई-प्रशासन कार्यक्रमांत पुरस्कार मिळवणारा नागपूर ग्रामीण हा राज्यातील एकमेव पोलीस घटक ठरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार आणि त्यांच्या चमूला प्रशस्तीपत्र देऊन गौरविले. यावेळी मंत्री आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल आणि पोलीस महासंचालक सदानंद दाते उपस्थित होते. या यशाबद्दल खासदार श्यामकुमार बर्वे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सागर खर्डे यांनी पोलीस दलाचे अभिनंदन केले आहे.
विशेष प्रतिनिधी चंदू मडावी
