आमणी बु येथे अवैध दारू विक्रीविरोधात महिलांचा संताप
सुनिलभाऊ राठोड यांच्या नेतृत्वात महागाव पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा
Ct india न्यूज जिल्हा प्रतिनिधी
महागाव तालुक्यातील आमणी बु या शिक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या गावात अवैध देशी दारू विक्रीचा विळखा दिवसेंदिवस वाढत असल्याने गावातील महिला आक्रमक झाल्या आहेत. महागाव येथून देशी दारूचे बॉक्स आणून आमणी बु येथे खुलेआम अवैधरित्या विक्री केली जात असल्याचा गंभीर आरोप गावकऱ्यांनी केला आहे. या अवैध धंद्यामुळे गावातील तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असून अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.
ही धक्कादायक माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते सुनिलभाऊ राठोड यांच्या नेतृत्वात गावातील महिलांनी थेट महागाव पोलीस स्टेशनवर धडक देत जोरदार आंदोलन केले. अवैध दारू विक्री तात्काळ बंद करून संबंधित दारू माफियांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी महिलांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, “गावातील युवकांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या दारू विक्रेत्यांना आता गावात थारा दिला जाणार नाही. शिक्षणाची गंगा वाहणाऱ्या आमणी बु गावाची प्रतिमा खराब करणाऱ्यांविरोधात महिलांचा लढा अधिक तीव्र होणार आहे.”
महागाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार धनराज निळे यांनीही अवैध दारू विक्रेत्यांना कडक शब्दांत इशारा दिला. “महागाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये यापूर्वीही अवैध दारू विक्री बंद करण्यात आली आहे. गावातील नागरिक व महिलांनी वेळोवेळी माहिती दिल्यास शंभर टक्के अवैध धंदे बंद केले जातील. कायद्याचा धाक दाखवून अवैध दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. पोलीस कारवाईपासून कुणालाही वाचवले जाणार नाही,” असा सज्जड दम ठाणेदार धनराज निळे यांनी भरला.
गावातील महिलांच्या या आक्रमक भूमिकेमुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याने दारू माफियांचे धाबे दणाणले आहेत.
