उमरखेड पोलिसांची दुहेरी कारवाई; गावठी पिस्तूल बाळगणारा व ४ महिन्यांपासून फरार आरोपी जेरबंद
यवतमाळ प्रतिनिधी एस. के. शब्बीर
उमरखेड पोलीस स्टेशनच्या पथकाने स्वतंत्र कारवाईत एकीकडे अवैधरित्या गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या आरोपीला अटक केली, तर दुसरीकडे गेल्या चार महिन्यांपासून फरार असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीलाही जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी शरद लोहकरे यांना गोपनीय माहिती मिळाली की, मार्लेगांव फाटा परिसरात एक व्यक्ती गावठी पिस्तूल बाळगून फिरत आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीकडून एक गावठी पिस्तूल (देशी कट्टा) जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या शस्त्राची किंमत सुमारे 31हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.तर
दुसऱ्या कारवाईत उमरखेड पोलीसांनी चार महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली. सदर आरोपीविरुद्ध उमरखेड पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल असून तो गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. गोपनीय माहितीच्या आधारे पोलीसांनी त्याचा मार्ग काढून त्याला ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ, अपर पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली उमरखेड पोलीस स्टेशनच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. या कारवाईमुळे अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांमध्ये तसेच फरार आरोपींमध्ये खळबळ उडाली असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उमरखेड पोलीसांची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.
