नागपूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; बकरी चोरीचे १२ गुन्हे उघड, ३ आरोपींना बेड्या

नागपूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; बकरी चोरीचे १२ गुन्हे उघड, ३ आरोपींना बेड्या

 

नागपूर:

नागपूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने बकरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून, तब्बल १२ गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत पोलिसांनी तीन अट्टल आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून कार, मोबाईल आणि रोख रकमेसह एकूण ४ लाख ५१ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जिल्ह्यात बकरी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या गुन्ह्यांचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेला तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीद्वारे आरोपी नागपूरच्या गुमथळा परिसरात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ सापळा रचून खालील तीन आरोपींना ताब्यात घेतले:

१. जावेद ऊर्फ सोनू जुल्फिकार अन्सारी (३७ वर्षे, रा. टेका नाका, नागपूर)

२. रोहित अशोक खोब्रागडे (३७ वर्षे, रा. यशोधरा नगर, नागपूर)

३. समीर शरीफ शेख (३० वर्षे, रा. टेका नाका, नागपुर,आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत (वडोदा, केळवद, खापा, कळमेश्वर, कन्हान, नरखेड आणि रामटेक) केलेल्या १२ चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीसाठी वापरलेली ह्युंदाई आय-२० कार (MH 01 AR 4012), ३ मोबाईल आणि बकऱ्या विकून मिळालेली २,२९,००० रुपयांची रोकड असा एकूण ४.५१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही यशस्वी कामगिरी नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. हर्ष ए. पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक श्री. अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे पशुपालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

 

नागपुर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *