करडे गावात पिस्तुलातून गोळीबार; सराईत गुन्हेगारावर जीवघेणा हल्ला करणारे पाच आरोपी अवघ्या 72 तासांत जेरबंद

करडे गावात पिस्तुलातून गोळीबार; सराईत गुन्हेगारावर जीवघेणा हल्ला करणारे पाच आरोपी अवघ्या 72 तासांत जेरबंद

 

शिरूर पोलिसांच्या डीबी पथकाची दमदार कामगिरी; दोन विधीसंघर्षित बालकांचाही सहभाग उघड

 

शिरूर तालुक्यातील करडे गावात सराईत गुन्हेगारावर पिस्तुलातून गोळीबार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना शिरूर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने अवघ्या 72 तासांच्या आत परजिल्ह्यातून ताब्यात घेत मोठे यश संपादन केले आहे. या कारवाईत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, दोन विधीसंघर्षित बालकांचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 जुलै 2026 रोजी पहाटे सुमारे 1.30 वाजण्याच्या सुमारास करडे (ता. शिरूर) गावातील हनुमान मंदिराच्या पाठीमागे, भैरवनाथ मंदिराजवळील स्मशानभूमी शेजारी असलेल्या तलाव परिसरात ही घटना घडली. जुन्या वादातून आरोपींनी बेकायदेशीर जमाव करून फिर्यादी निखिल सतीश थेऊरकर (वय 23, रा. करडे) याला शिवीगाळ व दमदाटी करत जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर पिस्तुलातून सलग तीन राउंड गोळीबार केला. सुदैवाने या हल्ल्यात तो बचावला.

या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद पाटील करत आहेत.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी तातडीने स्वतंत्र तपास पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांना आरोपी सुपा (ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) बसस्थानक परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी सुपा येथे सापळा रचून शिताफीने अथर्व उर्फ टिन्या रावसाहेब शेळके वय 19, रोहन उर्फ दादया गणेश पंचमुख वय 19, आदित्य दशरथ लंघे वय19, निखिल विलास कायस्थ वय19 आणि सनी परमेश्वर मस्के वय 20 या पाच आरोपींना ताब्यात घेत अटक केली. या गुन्ह्यात दोन विधीसंघर्षित बालकांचाही सहभाग असल्याचे उघड झाले आहे.

तपासादरम्यान अटक करण्यात आलेले अथर्व उर्फ टिन्या शेळके आणि रोहन उर्फ दादया पंचमुख हे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्याविरुद्ध रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात खंडणी, अवैध शस्त्र बाळगणे, बेकायदेशीर जमाव करून मारहाण करणे अशा स्वरूपाचे एकूण पाच गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, या प्रकरणातील फिर्यादी निखिल थेऊरकर याच्यावरही यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, अवैध अग्निशस्त्र बाळगणे आणि गंभीर मारहाणीचे गुन्हे शिरूर, रांजणगाव एमआयडीसी आणि परभणी पोलीस ठाण्यात दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे. फिर्यादीकडून आरोपी व विधीसंघर्षित बालकांना पूर्वी मारहाण झाल्याच्या रागातूनच हा गोळीबार केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींना 21 जुलै 2026 रोजी न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रतिनिधी: शुभम वाकचौरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *