कनियाडोल-सावनेर मार्गावर कोसळले महाकाय झाड; सार्वजनिक बांधकाम विभाग झोपेत

*कनियाडोल-सावनेर मार्गावर कोसळले महाकाय झाड; सार्वजनिक बांधकाम विभाग झोपेत? रस्ता मोकळा करण्याची जबाबदारी फक्त वाहतूक पोलिसांचीच का?*

कळमेश्वर:

तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कनियाडोल-सावनेर मार्गावर एक महाकाय झाड अचानक कोसळल्याची घटना घडली. रस्त्याच्या मधोमध झाड आडवे पडल्याने या मार्गावरील वाहतूक सुमारे दोन ते अडीच तास पूर्णपणे ठप्प झाली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अखेर मोहपा पोलीस आणि वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. मात्र, या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून परिसरात सतत पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जमिनीतील ओलावा वाढून झाडाच्या मुळांची पकड सैल झाली, ज्यामुळे हे जुने आणि महाकाय झाड थेट रस्त्यावर कोसळले. झाड पडल्यामुळे मार्गाच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तब्बल दोन ते अडीच तास वाहतूक बंद असल्याने वाहनचालक आणि प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. घटनेची माहिती मिळताच मोहपा पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी आणि वाहतूक नियंत्रण पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने रस्त्यावर पडलेल्या झाडाच्या फांद्या आणि खोड तोडण्यास सुरुवात केली. अथक प्रयत्नांनंतर रस्त्यावरील अडथळा दूर करण्यात यश आले आणि वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाली. पोलिसांच्या या जलद कार्यवाहीचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.

रस्त्यावरील अडथळा हटवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी तत्परता दाखवली असली तरी, या संपूर्ण घटनेत कळमेश्वर सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष ठळकपणे समोर आले आहे. यामुळे, कळमेश्वर सार्वजनिक बांधकाम विभाग झोपेत आहे का, रस्त्यावरील अडथळे दूर करून मार्ग सुरळीत करण्याची सर्व कामे फक्त वाहतूक पोलीस विभागाकडेच दिलेली आहेत का, असे प्रश्नार्थक चिन्ह आता नागरिकांकडून उपस्थित केले जात आहे. तालुक्यातील अनेक प्रमुख रस्त्यांच्या कडेला अशीच जुनी, जीर्ण आणि धोकादायक झाडे उभी आहेत, जी मोठ्या अपघाताला निमंत्रण देत आहेत. संबंधित विभागाकडून या झाडांचे नियमित सर्वेक्षण आणि छाटणी होत नसल्याने भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने वेळीच योग्य पावले न उचलल्यास नागरिकांच्या जिवावर बेतू शकते, असा इशारा देण्यात आला आहे.

 

 

विशेष प्रतिनिधी चंदू मडावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *