सायबर फसवणुकीला आळा घालायचा असेल तर जागरूकता हाच पहिला बचाव!
उमरखेड पोलिसांची कारवाई कौतुकास्पद; मात्र नागरिकांनीही ‘माझे खाते, माझी जबाबदारी’ ही भूमिका स्वीकारण्याची गरज
उमरखेड : डिजिटल युगात मोबाईल आणि ऑनलाइन व्यवहार जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत. मात्र, याच तंत्रज्ञानाचा गैरफायदा घेत सायबर भामटे नागरिकांची आर्थिक फसवणूक करीत असल्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. उमरखेड पोलिसांनी म्यूल अकाउंटच्या माध्यमातून झालेल्या सायबर फसवणुकीच्या दोन प्रकरणांत कारवाई करून आरोपींना अटक केल्याने पोलिसांचे काम निश्चितच कौतुकास्पद आहे. मात्र, या घटनेने एक गंभीर प्रश्नही ऐरणीवर आणला आहे—सायबर गुन्हेगारांना संधी मिळते तरी कुठून?
पोलिसांच्या माहितीनुसार, म्यूल अकाउंटच्या माध्यमातून संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून, संबंधित खात्यांमध्ये ४ लाख ७४ हजार रुपये आणि ७ लाख ८७ हजार ६५२ रुपये अशा मोठ्या रकमेचे व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून उमरखेड पोलिसांनी केलेली कारवाई नागरिकांसाठी निश्चितच दिलासादायक आहे.
मात्र, २१व्या शतकात वावरताना डिजिटल व्यवहारांची साधी-सोपी खबरदारीही न घेणे ही चिंतेची बाब आहे. कोणालाही आपले बँक खाते, एटीएम, यूपीआय, ओटीपी, पासवर्ड किंवा बँकिंगची गोपनीय माहिती सहज उपलब्ध करून देणे म्हणजे स्वतःच्या पैशांच्या सुरक्षेची दारे उघडी ठेवण्यासारखे आहे. आर्थिक आमिष, कमिशन किंवा तत्काळ पैशांच्या प्रलोभनाला बळी पडून आपले खाते दुसऱ्यांच्या व्यवहारासाठी वापरू देणे भविष्यात मोठ्या कायदेशीर अडचणीचे कारण ठरू शकते.
प्रशासनाने आपली जबाबदारी पार पाडावीच; परंतु प्रत्येक ऑनलाइन व्यवहाराच्या सुरक्षिततेची पहिली जबाबदारी नागरिकांचीही आहे. केवळ पोलिसांनी कारवाई करावी आणि आपण निष्काळजी राहावे, अशी भूमिका आता चालणार नाही. डिजिटल साक्षरता ही काळाची गरज असून, प्रत्येक कुटुंबाने आपल्या पाल्यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना सायबर फसवणुकीपासून बचावाचे धडे देणे आवश्यक आहे.
उमरखेड पोलिसांच्या पथकाची उल्लेखनीय कामगिरी
ही कारवाई मा. कुमार चिंत्ता, पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. अशोक थोरात, अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. अमर मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद विभाग तथा अतिरिक्त कार्यभार उमरखेड उपविभाग, मा. शंकर पांचाळ, पोलीस निरीक्षक उमरखेड पोलीस स्टेशन आणि यशोधरा मुनेश्वर, पोलीस निरीक्षक सायबर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तसेच डी.बी. प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, पोलीस उपनिरीक्षक योगेश जाधव, सहायक फौजदार विजय पत्तंगो, पोलीस हवालदार चंदन जाधव, पोलीस हवालदार नरेंद्र पुंड, पोलीस हवालदार अतुल तागडे, पोलीस हवालदार संतोष राठोड, पोलीस कॉन्स्टेबल संघशिल टेंभरे, पोलीस कॉन्स्टेबल अमित नोडे, पोलीस कॉन्स्टेबल विष्णू राठोड, पोलीस कॉन्स्टेबल दिगंबर गिते आणि पोलीस कॉन्स्टेबल निवृत्ती महालनवर यांनी या कारवाईत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
उमरखेड पोलिसांची ही कारवाई गुन्हेगारांसाठी इशारा तर नागरिकांसाठी जागृतीचा धडा ठरावी. पोलिसांची कारवाई सुरूच राहील; मात्र सायबर फसवणूक रोखण्यासाठी ‘सावधान नागरिक, सुरक्षित व्यवहार’ ही चळवळ प्रत्येक घरापासून सुरू होणे गरजेचे आहे.
खाते तुमचे, पैसा तुमचा आणि जबाबदारीही तुमचीच एका छोट्याशा निष्काळजीपणामुळे आयुष्यभराची कमाई धोक्यात येऊ शकते!
बबलू उर्फ मोहम्मद शेख तालुका प्रतिनिधी उमरखेड संपर्क क्रमांक : 90679 34036
