पळसखेड्यात संत सावता माळी महाराजांच्या बॅनरची तोडफोड; फरदापूर पोलीस ठाण्यात निवेदन, दोषींवर कठोर कारवाईचे पोलीस प्रशासनाचे आश्वासन

पळसखेड्यात संत सावता माळी महाराजांच्या बॅनरची तोडफोड; फरदापूर पोलीस ठाण्यात निवेदन, दोषींवर कठोर कारवाईचे पोलीस प्रशासनाचे आश्वासन

सोयगाव, (प्रतिनिधी) : संतोष गर्दे

 

 

दिनांक 12सोयगाव तालुक्यातील पळसखेडा येथे ११ मंगळवार रोजी संत शिरोमणी सावता माळी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त लावण्यात आलेल्या अभिवादनाच्या बॅनरची अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे माळी समाजात संतापाची लाट उसळली असून दोषींविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

 

या प्रकरणी माळी समाजाच्या वतीने फरदापूर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. निवेदन स्वीकारल्यानंतर पोलीस प्रशासनाने या घटनेची सखोल चौकशी करून संबंधित दोषींचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन दिले आहे.

 

माळी समाजाने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत अशा समाजकंटकांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. धार्मिक व सामाजिक भावना दुखावणाऱ्या अशा प्रकारांना कायद्याच्या चौकटीतच कठोर उत्तर मिळाले पाहिजे, अशी भावना समाजबांधवांनी व्यक्त केली.

 

यावेळी पळसखेडा येथील कैलास कडूबा शेलेकर, समाधान कैलास शिरसागर, गजानन पंडित बावस्कर यांनी माळी समाजाच्या वतीने निवेदन सादर केले. तसेच सोयगाव तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष दिलीप देशमुख हे देखील उपस्थित होते.

 

चौकट,

“संत सावता माळी महाराज हे सर्व समाजाचे श्रद्धास्थान आहेत. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त लावलेल्या बॅनरची तोडफोड करणे हा अत्यंत निषेधार्ह प्रकार आहे. कायदा हातात घेणाऱ्या कोणालाही पाठीशी घालता कामा नये. पोलीस प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार दोषींना तातडीने शोधून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी. अशा समाजकंटकांवर कायद्याचा धाक निर्माण होणे आवश्यक असून त्यामुळे भविष्यात अशा घटना घडण्यास आळा बसेल. कायद्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि माळी समाजाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे.”

 

दिलीप देशमुख (तालुकाध्यक्ष, काँग्रेस कमिटी, सोयगाव)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *