काटोल तालुक्यात बनावट देशी व विदेशी दारू कारखान्यावर छापा; ५४ लाखांहून अधिक मुद्देमालासह चौघांवर गुन्हा दाखल
काटोल : नागपूर ग्रामीण जिल्हा पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त मोहीम राबवून काटोल पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या एका मोठ्या बनावट देशी व विदेशी दारू निर्मितीच्या कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. मौजे चिखलागड येथील आनंदगड माळाच्या पायथ्याशी असलेल्या एका शेतातील घरामध्ये हा अवैध कारखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे संयुक्त पथकाने अचानक धाड टाकून कारवाई केली असता, घटनास्थळावरून ५४,८१,०७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईत देशी दारू रॉकेट संत्रा ब्रँडचे ९० मिली क्षमतेचे २०४ बॉक्स, देशी दारू टँगो पंच ब्रँडचे ९० मिली क्षमतेचे १५६ बॉक्स आणि रॉयल स्टॅग विदेशी मद्याच्या १८० मिली क्षमतेच्या ४०८ बाटल्या असा एकूण ३६८ बॉक्स बनावट मद्यसाठा हस्तगत करण्यात आला. याव्यतिरिक्त विदेशी दारू तयार करण्यासाठी लागणारे १५०० बल्क लिटर तयार ब्लेंड, देशी दारू बनविण्यासाठी लागणारे १००० बल्क लिटर रेक्टिफाइड स्पिरिट, दारू निर्मितीचे विविध साहित्य तसेच मालवाहतुकीसाठी वापरण्यात येणारी एक पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप गाडी (क्रमांक MH०४/JU८७२२) आणि पांढऱ्या रंगाची आय-२० कार (क्रमांक MH३४BR१५७३) असा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हा अवैध कारखाना चालवणाऱ्या लोकेश राजेश भैसारे (वय ३७ वर्षे, रा. प्लॉट क्र. ९८, कपिल नगर, नारीरोड, उप्पलवाडी, जि. नागपूर), यश सुरेश शेंडे (वय २५ वर्षे, रा. सायखेडा, ता. केळापूर, जि. यवतमाळ), देवेन रामचंद्र जाधव (वय २६ वर्षे, रा. बलवाडी, ता. वरला, जि. बडवानी, म.प्र.) आणि दीपक गुलाब पावरा (वय ३० वर्षे, रा. दूधखेडा, ता. वरला, जि. बडवानी, म.प्र.) या चार आरोपींविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाने महाराष्ट्र दारूबंदी कायदा, १९४९ नुसार गुन्हा नोंदवला आहे.
सदर कारवाई नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के, राज्य उत्पादन शुल्क नागपूर-२ चे अधीक्षक वैभव वैद्य आणि प्रभारी उप अधीक्षक मंगेश कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक आनंद भा. पवार (काटोल), मंगेश कावळे (उमरेड), दत्तात्रेय लाडके (सावनेर), जयेंद्र जिकार (रामटेक) व त्यांचा कर्मचारी वर्ग, तसेच काटोल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाट, सपोनि विवेक राऊत आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून ही धडक कारवाई यशस्वी केली.
विशेष प्रतिनिधी चंदू मडावी
