मौद्यात २४ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड; ७० हजारांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटकमौदा:येथील पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या माथणी गावात झालेली घरफोडी अवघ्या २४ तासांत उघडकीस आणण्यात मौदा पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका १९ वर्षीय आरोपीला अटक केली असून, त्याच्यासोबत असलेल्या विधीसंघर्षग्रस्त बालकाला (सज्ञान नसलेला साथीदार) ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चोरीला गेलेले २१ ग्रॅम सोन्याचे दागिने, ज्यांची किंमत ७०,३०० रुपये आहे, पूर्णपणे जप्त करण्यात आली आहे.घटनेचा थरार आणि पोलिसांची कारवाई:माथणी येथील रहिवासी विशाल रामकृष्ण वासनिक यांनी पोलिसांत तक्रार दिली होती की, ३० ऑगस्ट रोजी रात्री त्यांचे कुटुंब घरी नसताना अज्ञात चोरांनी कुलूप तोडून कपाटातील सोन्याचे दागिने लंपास केले. पोलिसांनी कलम ३०५ (अ) आणि ३३१ (४) भा.न्या.स. २०२३ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.मौदा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने गुप्त बातमीदार आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे वेगाने चक्र फिरवली. अवघ्या २४ तासांत माथणी येथीलच संशयित आरोपी आशय धर्मदास वासनिक (वय १९ वर्ष) आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली व पोलिसांनी संपूर्ण मुद्देमाल जप्त केला.ही कामगिरी नागपूर ग्रामीणचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार, अप्पर पोलिस अधीक्षक अनिल म्हस्के, आणि कन्हाण उपविभागाचे पोलिस अधिकारी शशांत एन.एम. यांच्या मार्गदर्शनाखाली मौदा पोलिसांनी केली.
नागपुर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार
