सोयगाव तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची काँग्रेसची मागणी
सोयगाव तालुका प्रतिनिधी संतोष गर्दे
सोयगाव तालुका तात्काळ दुष्काळग्रस्त घोषित करा
शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्याची काँग्रेसची मागणी; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
सोयगाव, दि . ८ ऑगस्ट महिन्यात अत्यल्प पाऊस झाल्याने सोयगाव तालुक्यातील खरीप पिके पाण्याअभावी करपू लागली आहेत. विहिरींमध्ये पाणी उपलब्ध असतानाही अनियमित व अपुऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना वेळेवर पाणी देता आले नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून, सोयगाव तालुका तात्काळ दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.
राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष दिलीप देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार तथा दंडाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. करपलेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, दुष्काळी निकष लागू करावेत, शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत द्यावी, शेतीपंपांना नियमित व पुरेसा वीजपुरवठा करावा, तसेच महसूल व कृषी विभागाने संयुक्त पाहणी करून शासनाकडे तातडीने अहवाल पाठवावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
“शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर उभी पिके करपत आहेत. शेतकऱ्यांना आश्वासनांपेक्षा तातडीच्या मदतीची गरज आहे,” असे देशमुख यांनी सांगितले.
पीक कर्ज व कर्जमाफीच्या प्रक्रियेबाबतही देशमुख यांनी प्रश्न उपस्थित केला. पात्र शेतकऱ्यांची उर्वरित यादी तातडीने जाहीर करून सर्व पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. शेतकऱ्यांना वारंवार शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजविण्याची वेळ येऊ नये, असेही त्यांनी नमूद केले.
पावसाची स्थिती कायम राहिल्यास आगामी काळात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने आतापासूनच चारा व पशुधनासाठी आवश्यक नियोजन करावे, अशी मागणीही काँग्रेसने केली.
यावेळी तालुका उपाध्यक्ष भरतभाऊ पगारे, जिल्हा उपाध्यक्ष राजेश काळे, जिल्हा सरचिटणीस सुनील माकोडे, तालुका शिक्षक सेल अध्यक्ष सुनील चोरमाले, सुनील चव्हाण, अनिल चव्हाण, प्रमोद कोते, नामदेव लांडगे, भागवत देवकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिलीप देशमुख यांनी दिला.
फोटो ओळ : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देताना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप देशमुख व पदाधिकारी.
