गोंदिया–मुंबई वंदे भारत, नवीन रेल्वे सेवा, प्रमुख स्थानकांवर थांबे तसेच गुदमा–प्रतापबाग रेल्वे

गोंदिया–मुंबई वंदे भारत, नवीन रेल्वे सेवा, प्रमुख स्थानकांवर थांबे तसेच गुदमा–प्रतापबाग रेल्वे मार्गासाठी थेट खरेदीचा मुद्दा उपस्थित

 

गोंदिया, दि. २० सप्टेंबर : नागपूर येथील हॉटेल तुली इम्पीरियल, रामदासपेठ येथे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंडळस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत खासदार श्री. राजेंद्र जैन यांनी उपस्थित राहून गोंदिया व परिसरातील विविध रेल्वेसंबंधी समस्या आणि प्रलंबित मागण्यांकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले. या बैठकीला खासदार श्री. प्रफुल पटेल यांचे प्रतिनिधी म्हणून आमदार श्री. राजूभाऊ कारेमोरे उपस्थित होते.

बैठकीत खासदार राजेंद्र जैन यांनी गोंदिया ते मुंबई वंदे भारत रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी मांडली. तसेच गोंदिया परिसरातून धावणाऱ्या महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांना आमगाव, सालेकसा, तिरोडा व भंडारा या स्थानकांवर आवश्यकतेनुसार थांबे देण्यात यावेत, नवीन रेल्वेगाड्या सुरू करण्यात याव्यात आणि गोंदिया क्षेत्राची रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करण्यात यावी, याबाबत अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.

यासोबतच गुदमा–प्रतापबाग नवीन रेल्वे मार्गासाठी होणाऱ्या जमीन अधिग्रहणाचा मुद्दाही खासदार जैन यांनी उपस्थित केला. या प्रकल्पामुळे प्रभावित होणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा, तसेच जमीन थेट खरेदी (Direct Purchase) प्रक्रियेद्वारे घेऊन शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.

गोंदिया व आसपासच्या ग्रामीण भागातील प्रवाशांची वाढती गरज लक्षात घेऊन रेल्वे सुविधांचा विस्तार करणे आवश्यक असल्याचे खासदार राजेंद्र जैन यांनी नमूद केले. प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मांडण्यात आलेल्या प्रस्तावांवर रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने विचार करून वेळबद्ध पद्धतीने सकारात्मक कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली

 

गोंदिया जिल्हा प्रतिनिधी महादेव शेन्डे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *