शाळेच्या प्रांगणातून अंतराळाची सफर! ‘गगनवेध’च्या उपक्रमाची जागतिक स्तरावर नोंद!*

*शाळेच्या प्रांगणातून अंतराळाची सफर! ‘गगनवेध’च्या उपक्रमाची जागतिक स्तरावर नोंद!*

 

जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त

जागतिक अंतराळ सप्ताहाचे औचित्य साधून श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या *गगनवेध खगोलशास्त्र मंडळा* ’च्या वतीने दि. ९ ऑक्टोबर २०२६ पासून आकाशदर्शन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या अभिनव उपक्रमात १०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना दुर्बिणीच्या साहाय्याने शनी ग्रहासह विविध तारकासमूहांचे निरीक्षण करण्याची संधी मिळाली. पाठ्यपुस्तकांतील खगोलशास्त्रीय संकल्पना प्रत्यक्ष आकाश निरीक्षणातून समजून घेताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर कुतूहल, उत्सुकता आणि आनंद दिसून आला. अवकाशातील ग्रह, तारे आणि तारकासमूह यांविषयी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळाले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, निरीक्षणशक्ती, जिज्ञासा आणि संशोधनवृत्ती विकसित होण्यास निश्चितच मदत होणार आहे.

*जागतिक अंतराळ सप्ताह आणि विज्ञान प्रसार*

संयुक्त राष्ट्र महासभेने १९९९ मध्ये ४ ते १० ऑक्टोबर हा कालावधी *जागतिक अंतराळ सप्ताह* (World Space Week) म्हणून घोषित केला. अंतराळ विज्ञान, अंतराळ तंत्रज्ञान आणि मानवजातीच्या विकासातील त्यांचे योगदान यांविषयी जनजागृती करणे, हा या सप्ताहाचा प्रमुख उद्देश आहे.

या जागतिक उपक्रमांत सहभागी होत श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या हायस्कूल विभागाने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष आकाश निरीक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. *विशेष म्हणजे, या उपक्रमाची नोंद जागतिक अंतराळ सप्ताहाच्या संयुक्त राष्ट्रांच्या अधिकृत संकेतस्थळावर करण्यात आली आहे*.

 

या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन प्रकल्पाचे संयोजक श्री. प्रमोद भंडारे आणि ‘गगनवेध खगोलशास्त्र मंडळातील विद्यार्थी गटाने केले. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग यांमुळे हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.

शाळेच्या प्रांगणातून अंतराळाचा वेध घेणाऱ्या या उपक्रमाने विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची नवी क्षितिजे खुली केली आहेत. स्थानिक स्तरावर सुरू झालेल्या या नावीन्यपूर्ण शैक्षणिक प्रयत्नाची जागतिक स्तरावर नोंद होणे, ही शाळेसाठी अभिमानाची आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी बाब आहे.

*पुस्तकातून ज्ञान, निरीक्षणातून अनुभव आणि संशोधनातून प्रगती* या त्रिसूत्रीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विज्ञानाभिमुख बनविण्याच्या दिशेने ‘गगनवेध’ खगोलशास्त्र मंडळाने टाकलेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे!

सी टी इंडिया न्यूज साठी ॲड.प्रकाश जोशी,सगरोळी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *