लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय

लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय

एन.एम.एस.एस. परीक्षेत वाजे विद्यालयाचे उत्तुंग यश; 23 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र

सिन्नर (ता. सिन्नर) :

सिन्नर येथील लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयाने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना (एन.एम.एस.एस.) परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून तब्बल 23 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा व नियोजनबद्ध मार्गदर्शनाचा हा ठोस पुरावा मानला जात आहे.

इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी ही राज्यस्तरीय परीक्षा अत्यंत स्पर्धात्मक व गुणवत्तेची कसोटी पाहणारी आहे. मानसिक क्षमता चाचणी (MAT) व शैक्षणिक प्रगती चाचणी (SAT) अशा दोन टप्प्यांत ही परीक्षा पार पडते. विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण सराव आणि शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाच्या बळावर हे उल्लेखनीय यश मिळवले.

विद्यालयात मागील काही महिन्यांपासून एन.एम.एस.एस. परीक्षेसाठी विशेष मार्गदर्शन वर्ग आयोजित करण्यात आले होते. सराव परीक्षा, प्रश्नपत्रिका सोडविण्याचे तंत्र, वेळेचे व्यवस्थापन तसेच वैयक्तिक शंका निरसन यावर विशेष भर देण्यात आला. कीर्ती जाधव, महेंद्र आढाव, वंदना पावसे व कदम मॅडम यांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता ओळखून नियोजनबद्ध तयारी करून घेतली.

या यशाबद्दल म.वि.प्र. सरचिटणीस नितीन ठाकरे, तालुका संचालक कृष्णाजी भगत, म.वि.प्र. शिक्षणाधिकारी भास्कर ढोके तसेच मुख्याध्यापक रामनाथ रायते, उपमुख्याध्यापिका मंगला हांडे, पर्यवेक्षक पांडुरंग करपे, विजयानंद कुमावत आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *