नागपूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; तेलंगणातून चोरीस गेलेला २५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नागपूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; तेलंगणातून चोरीस गेलेला २५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

 

 

 

 

कन्हान परिसरात नाकाबंदी करून हार्वेस्टर व ट्रक जप्त; राजस्थान येथील आरोपींना तेलंगणा पोलिसांच्या स्वाधीन केले

 

 

नागपूर: नागपूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत तेलंगणा राज्यातून चोरीस गेलेला हार्वेस्टर आणि वाहतुकीसाठी वापरलेला ट्रक असा एकूण २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई दिनांक १४/११/२०२६ रोजी कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दिनांक १४/११/२०२६ रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. यावेळी पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, तेलंगणा राज्यातील मेडक जिल्ह्यातील कुलचाराम पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०६ अन्वये दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक १८९/२०२६ मधील चोरीस गेलेला मुद्देमाल एका ट्रकमधून नागपूर-जबलपूर महामार्गाने नेण्यात येत आहे.

या खात्रीशीर माहितीच्या आधारे पथकाने कन्हान हद्दीतील तार कंपनीजवळ तात्काळ नाकाबंदी केली आणि संशयित ट्रक क्रमांक आर जे-४०/जी ए-५६५९ थांबवून त्याची तपासणी केली. झडतीदरम्यान या ट्रकमध्ये कुलचाराम पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेले ‘गॅम कंबाईन हार्वेस्टर’ मशीन आढळून आले.

आरोपी राजस्थान येथील रहिवासी

पोलिसांनी घटनास्थळावरून ट्रक चालक कामील खान (वल्द हारून खान, वय ३१ वर्षे), आमील खान (वल्द लियाकत खान, वय २० वर्षे), कैफ खान (वल्द लियाकत खान, वय १८ वर्षे) तसेच ०२ विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले. हे सर्व आरोपी ग्राम सारेकाला, तालुका तपुघडा, जिल्हा खैरथल-तिजारा (राज्य राजस्थान) येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी केलेल्या कौशल्यपूर्ण चौकशीत आरोपींनी कुलचाराम पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हा मुद्देमाल चोरून आणल्याची कबुली दिली.

मुद्देमाल व आरोपी तेलंगणा पोलिसांच्या स्वाधीन

या कारवाईत पोलिसांनी १० लाख रुपये किमतीचे गॅम कंबाईन हार्वेस्टर आणि १५ लाख रुपये किमतीचा ट्रक (क्रमांक आर जे-४०/जी ए-५६५९) असा एकूण २५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी सर्व आरोपी आणि जप्त केलेला मुद्देमाल कुलचाराम (जिल्हा मेडक, राज्य तेलंगणा) पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. ही संपूर्ण कारवाई नागपूर ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार आणि अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या पार पडली.

 

 

 

विशेष प्रतिनिधी चंदू मडावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *