top of page

पी.व्ही सिंधुची अखेर सुवर्ण पदकाला गवसणी ; पहिली भारतीय

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Aug 26, 2019
  • 2 min read

(वृत्तसंस्था) भारताच्या पी. व्ही. सिंधूने अखेरीस अंतिम फेरीतील अपयश मागे सोडून जेतेपदाला गवसणी घातली. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या सिंधूने यावेळी जेतेपदाचा दुष्काळ संपवला. तिने जपानच्या नोझोमी ओकुहाराला नमवून सुवर्णपदक नावावर केले. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्मपदक जिंकणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. या विजयासह सिंधूने 2017च्या जागतिक स्पर्धेतील अंतिम फेरीतील पराभवाची परतफेड केली. या स्पर्धेत सिंधूच्या नावे आता एक सुवर्ण, दोन रौप्य व दोन कांस्य अशी पाच पदकं झाली आहेत.या सामन्यापूर्वी सिंधू आणि ओकुहारा यांच्यातील जय पराजयाची आकडेवारी ही 8-7 अशी भारतीय खेळाडूच्या बाजूने होती. आकडेवारी सिंधूच्या पक्षात असली तरी तणावात सिंधूला साजेसा खेळ करता येत नाही, हा इतिहास होता. पण, सिंधूने पहिल्या गेमपासूनचा आक्रमक खेळ करताना ओकुहाराला डोकं वर काढूच दिले नाही. गणपती बाप्पा मोरया आणि वंदे मातरम् च्या गजर स्वित्झर्लंडमध्येही दुमदुमला. सिंधूच्या आक्रमक खेळाने तिच्या पाठीराख्यांचा उत्साह आणखी वाढवला. सिंधूने नेट प्लेसिंग आणि परतीच्या फटक्यांचा सुरेख खेळ करताना अवघ्या 16 मिनिटांत पहिला गेम 21-7 असा नावावर केला. सिंधूने पहिल्या गेममध्ये सलग 8 गुणांची कमाई केली. दुसऱ्या गेममध्येही सिंधूचा दबदबा कायम राहिला. ओकुराहा प्रचंड तणावाखाली जाणवली. त्याच्याच फायदा उचलत सिंधूनं संपूर्ण कोर्टवर ओकुहाराला नाचवले. सिंधूने अवघ्या सहा मिनिटांत 7-2 अशी आघाडी घेत ओकुहारावरील दडपण आणखी वाढवले. ही आघाडी तिनं 11-4 अशी वाढवत जेतेपदाच्या दिशेनं मोठी झेप घेतली. सिंधूने प्रचंड आत्मविश्वासानं खेळ करताना ओकुहाराचा सहज पराभव केला. सिंधूनं हा सामना 21-7, 21-7 असा जिंकला. सिंधूचे पदक वगळता जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताने आतापर्यंत 3 रौप्य व 6 कांस्यपदकांसह एकूण 9 पदकांची कमाई केली आहे. यापैकी प्रत्येकी दोन रौप्य व दोन कांस्य ही सिंधूने जिंकलेली आहेत. सिंधूनं 2013 व 2014 मध्ये कांस्यपदक जिकंले, तर 2017 व 2018मध्ये तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. 2017च्या अंतिम सामन्यात ओकुहाराकडूच भारतीय खेळाडूला पराभव पत्करावा लागला होता.  वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पदकविजेते झालेले भारतीय 1983 - प्रकाश पादुकोण ( पुरुष एकेरी) - कांस्यपदक 2011 - ज्वाला गट्टा व अश्विनी पोनप्पा ( महिला दुहेरी) - कांस्यपदक 2013 - पी. व्ही. सिंधू ( महिला एकेरी) - कांस्यपदक 2014 -   पी. व्ही. सिंधू ( महिला एकेरी) - कांस्यपदक 2015 - सायना नेहवाल ( महिला एकेरी) - रौप्यपदक 2017 - पी. व्ही. सिंधू ( महिला एकेरी) - रौप्यपदक 2018 - पी. व्ही. सिंधू ( महिला एकेरी) - रौप्यपदक 2019 - बी साई प्रणित ( पुरुष एकेरी) - कांस्यपदक

Comments


bottom of page