: मागील दोन-अडीच महिन्यांपासून पैठण तहसील कार्यालयात कायमस्वरूपी तहस
- CT India News
- Jan 7, 2022
- 1 min read
प्रतिनिधी- मिना परळकर औरंगाबाद, : मागील दोन-अडीच महिन्यांपासून पैठण तहसील कार्यालयात कायमस्वरूपी तहसीलदार नसल्याने सर्व भार नायब तहसीलदार तसेच इतर कर्मचाऱ्यावर पडला आहे. यामुळे नागरीकांची तहसील संबंधित कामे वेळेत पूर्ण होत नाहीत. अशी मागणी राष्ट्रवादीच्या अनिता वानखेडे यांनी यापूर्वी निवेदनातून केली होती. मात्र अद्याप याची दखल घेतली गेली नाही. यासाठी वानखेडे यांनी परत (दि.५) रोजी विभागीय आयुक्तांना स्मरण पत्र देऊन तातडीने कायमस्वरूपी तहसीलदार द्या, नसता २६ जानेवारी पासून कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करु असा इशारा स्मरण पत्रातून देण्यात आला आहे.
कायमस्वरूपी तहसीलदार द्या अशी मागणी वानखेडे यांनी यापूर्वी निवेदनातून केली होती. मात्र यावर बरेच दिवस उलटून ही अद्याप कुठलीही दखल घेतली गेली नसल्याने वानखेडे यांनी परत स्मरण पत्रातून याकामाची आठवण करून दिली. यात त्यांनी म्हटले आहे की, दोन ते अडीच महिने झाले तसे पैठण तहसील कार्यालयात कायमस्वरूपी तहसीलदार नाही. यामुळे कार्यालयात प्रचंड अनागोंदी कारभार सुरू आहे. सर्व कामांचा भार नायब तहसीलदार, लिपिक, कोतवाल व अव्वल कारकुन यांच्यावर पडलेला आहे. यामुळे जनतेची अनेक कामे प्रलंबित रहात आहेत. याचा गैरफायदा उचलत प्रशासकीय कामात मोठ्या प्रमाणात अफरातफर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा जनतेची गैरसोय लक्षात घेता तातडीने कायमस्वरूपी तहसीलदाराची नियुक्ती करावी. नसता जनतेच्या हितासाठी येणाऱ्या २६ जानेवारी पासून आपल्या कार्यालयासमोर लोकशाही मार्गाचा अवलंब करून आमरण उपोषण सुरू करेल, असे विभागीय आयुक्त यांना दिलेल्या स्मरण पत्रात म्हटले आहे.









Comments