राज्यातील शाळांमधील परीक्षा वेळापत्रकात बदल होणार! (मुंबई विशेष प्रतिनिधी उदय नरे) राज्यातील इ.
- CT India News
- Mar 24, 2022
- 2 min read
राज्यातील शाळांमधील परीक्षा वेळापत्रकात बदल होणार!
(मुंबई विशेष प्रतिनिधी उदय नरे)
राज्यातील इ.१ ली ते इ.९ वी व इ. ११ वी च्या शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास, तसेच शाळांची वेळ व कार्यकाळाबाबत शिक्षण विभागाचे परीपत्रक जाहीर
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन परिपत्रक, दि. ७ जुलै २०२१ अन्वये ग्रामीण भागातील कोरोनामुक्त गावात इ. ८ वी ते इ.१२ वीचे व दि.१० ऑगस्ट २०२१ रोजीच्या परिपत्रकान्वये ग्रामीण भागात इ.५ वी ते इ.७ वी व शहरी भागातील इ. ८ वी ते इ. १२ वी तसेच दि.२४ सप्टेंबर, २०२१ रोजीच्या परिपत्रकान्वये शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ मध्ये राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते इयत्ता बारावी व शहरी भागातील इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळा दि.०४ ऑक्टोबर, २०२१ पासून सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. एकूणच राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता १ ली ते इयत्ता ४ थी व महापालिका हद्दीतील इयत्ता १ ली ते ७ वी चे वर्ग दि.०१ डिसेंबर, २०२१ रोजी पासून सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन संदर्भ क्र.११ येथील आदेशान्वये आपत्ती व्यवस्थापन विभागाने राज्यातील सर्वच शाळा दि.१५ फेब्रुवारी, २०२२ पर्यंत बंद करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले होते. तथापि, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव राज्याच्या सर्व भागात सारख्या प्रमाणात नसल्याने व राज्यातील ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे, अशा भागातून शाळा सुरु करण्याबाबत सातत्याने मागणी करण्यात येत असल्याने दिनांक २० जानेवारी, २०२२ रोजीच्या परिपत्रकान्वये राज्यातील इ.१ ली ते १२ वी च्या शाळा स्थानिक परिस्थितीचा विचार करुन दि. २४ जानेवारी २०२२ पासून पुन्हा सुरु करण्याचे अधिकार महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिका आयुक्त व राज्यातील इतर भागात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना शाळा सुरु करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत.
२. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत असून राज्यातील सर्व आस्थापना / कार्यक्रमांवरील कोरोना विषयक निर्बंध टप्प्या-टप्प्याने उठविण्यात येत आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शासन आता खालीलप्रमाणे आदेश देत आहे:
२.१. सर्वसाधारणपणे दरवर्षी माहे मार्चपासून सकाळच्या सत्रात शाळा भरण्यास परवानगी दिली जाते. या शैक्षणिक वर्षात मार्च पासून एप्रिल अखेरपर्यंत सकाळच्या सत्रात शाळा सुरू करण्याऐवजी इयत्ता १ ली ते ९ वी व इयत्ता ११ वी चे वर्ग असणाऱ्या शाळा पूर्णवेळ सुरू ठेवण्यात याव्यात.
२.२. माहे एप्रिल अखेरपर्यंत शनिवारी पूर्णवेळ शाळा सूरू ठेवाव्यात. तसेच रविवारी ऐच्छिक स्वरूपात शाळा सूरू ठेवता येईल.
२.३. इयत्ता १ ली ते ९ वी व इयत्ता ११ वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा माहे एप्रिल महिन्यातील ३ऱ्या आठवड्यात घेण्यात याव्यात व निकाल मे महिन्यात जाहीर करण्यात यावा. २.४. सकाळच्या सत्रात शाळा घेणे आवश्यक असल्यास अध्यापनाच्या तासिका पूर्णवेळ शाळेप्रमाणे घेण्यात याव्यात.
२.५. दररोज १०० टक्के विद्यार्थी उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात येत आहे.
३. यापूर्वी दिनांक २० जानेवारी, २०२२ रोजीच्या परिपत्रकान्वये महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिका आयुक्त व राज्यातील इतर भागात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना देण्यात आलेले अधिकार अबाधित राहतील.
शिक्षण विभागाच्या या परीपत्रकाने सर्व परीक्षा व सूट्टीचे नियोजन कोलमडून गेले आहे असे निधी शेट्टी यांनी सांगितले. तर प्रकाश महाजन यांनी परीक्षा जाहीर झाल्यामुळे आता रेल्वे बुकिंग व इतर प्रवास याचा पुर्नविचार कशाप्रकारे करावे ही चिंता व्यक्त केली आहे
Comments