रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस
- CT INDIA NEWS

- Jul 28, 2019
- 1 min read

अलिबाग :- (वृत्तसंस्था)रायगड जिल्ह्यला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. जिल्ह्य़ातील सर्व नद्या दुथडी भरून वाहात असल्याने महाड, नागोठणे, रोहा, नेरळ परिसराला पुराचा तडाखा बसला आहे. रस्ते पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. इंदापूर ते गोरेगाव दरम्यान रुळांवर पाणी साचल्याने कोकण रेल्वेची सेवाही विस्कळीत झाली आहे. माथेरानमध्ये ४३७ तर पेण येथे ४०० मिमी विक्रमी पावसाची नोंद झाली आहे.गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यत सरासरी २१३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टीमुळे सावित्री, आंबा, कुंडलिका, उल्हास नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर पातळगंगा, भोगावती, काळ नद्या दुथडी भरून वाहत आहेत. सावित्री नदीच्या पाण्यामुळे महाड शहरात मध्यरात्रीपासून पूरस्थिती निर्माण झाली. महाडकडून रायगड किल्ल्याकडे जाणारी वाहतूक बंद होती. पोलादपूरमधील सावद, धारवली, वावे, हावरे, कालवली गावांचा संपर्क खंडित झाला होता. तर अंबानदीचे पाणी नागोठणे परिसरात शिरले. वाकण-पाली मार्गावर पुराचे पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली. सुधागड पाली येथील उन्हेरे, उद्धर, भेरव, वाफेघर, खवली गावांचा संपर्क तुटला होता.कर्जत तालुक्यातील सोलनपाडा पाझर तलाव धोकादायक स्थितीत आला असल्याने तेथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. उल्हास नदीने धोका पातळी ओलांडल्याने नेरळ परिसरातील अनेक गावांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. पाताळगंगा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत होती. मुंबई-पुणे द्रुतगती यांना जोडणाऱ्या मार्गावरील सावरोली पुलावरून पुराचे पाणी वाहत होते. माणगाव-श्रीवर्धन रस्त्यावर मोरबे पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद होती. हेटवणे धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्यामुळे भोगावती नदी किनाऱ्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. याशिवाय काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडणे, दरडी कोसळणे, वीजपुरवठा खंडित होणे, घरांची आणि गोठय़ांची पडझड होणे यांसारख्या घटना घडल्या. कर्जत येथील सेलू येथून २५ नागरिकांना, तर जामरूंग-सोलनपाडा येथील १५६ जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. रोहा तालुक्यातील आंबेवाडी ८४ जणांना स्थलांतरित करण्यात आले. अलिबाग तालुक्यातील रामराज पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती







Comments